Satara ZP: सभापती पदांवरून पुन्हा जि.प.मध्ये रणकंदन होणार

भाजपकडून विरोधी मंत्र्यांच्या मतदारसंघात कमळ फुलवणाऱ्यांना प्राधान्य; सेना-राष्ट्रवादीकडून भाजपला नडणाऱ्यांना संधी
Satara ZP
Satara ZPPudhari
Published on
Updated on

सातारा : जिल्ह्याचे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर आता विषय समितींच्या सभापती पदांवरूनही रणकंदन होण्याची चिन्हे आहेत. चार सभापती पदांच्या निवडी 4 एप्रिल रोजी होणार आहेत. भाजपकडून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या मतदारसंघात कमळ फुलवणाऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे निश्चित आहे तर राष्ट्रवादी व सेनेकडून पलटवार करताना भाजपला नडणाऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गटात राडा झाला. या राजकीय राड्यातही अध्यक्षपदी डॉ. प्रियाताई शिंदे व उपाध्यक्षपदी राजूभैया भोसले यांची निवड झाली. या राड्याचे पडसाद राज्याच्या विधानसभा व विधान परिषदेच्या सभागृहातही उमटले. या निवडी पूर्ण होत आहेत तोच इच्छुकांना विषय समितीच्या सभापती पदाचे वेध लागले आहेत. 4 एप्रिल रोजी या निवडी होत आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी झालेल्या राजकीय राड्यानंतर आता विषय समिती सभापती निवडीतही घमासान होण्याची चिन्हे आहेत.

शिक्षण व अर्थ समिती, कृषी व पशुसंवर्धन समिती, समाजकल्याण समिती, महिला व बालकल्याण समिती या चार विषय समितींच्या सभापती पदांसाठी चुरस निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेत भाजपचे 27, राष्ट्रवादी काँग्रेसचे 20, शिवसेना शिंदे गटाचे 15, राष्ट्रीय काँग्रेस एक, स्वाभिमानी शेतकरी संघटना एक आणि अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षपदी इच्छुक असूनही संधी न मिळालेल्या नाराजांना विषय समित्यांचे सभापतिपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होणार आहे.

कामेश कांबळे यांची भूमिका पुन्हा निर्णायक

अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी अपहरणनाट्य घडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल देसाई व संदीप मांडवे यांना कथित अपहरणाच्या गुन्ह्यात अटक केल्याने त्यांना मतदान करता आले नाही. यावेळी ते दोघेही मतदानाला उपस्थित असतील; तर अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीत राष्ट्रवादीतून निवडून आलेले कामेश कांबळे यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्या शब्दाखातर भाजपला मतदान केले. कांबळे सभापती पदाच्या निवडणुकीत कोणती भूमिका घेतात याची उत्सुकता आहे. कांबळे यांना कोणते सभापतिपद कोणत्या पक्षाकडून ऑफर होणार यावर ही गणिते अवलंबून आहेत. राजू भोसले हे जवळचे असल्याने कांबळे यांनी भाजपला मतदान केले मात्र आता ते पक्षाबरोबर राहणार का, याविषयी उत्सुकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news