

सातारा : सातारा जिल्हा परिषदेचे सन 2026-27 या वर्षात अपेक्षित जमा 18 कोटी 92 लाख रुपये विचारात घेवून एक लाख रुपये शिलकीचे व 45 कोटी 40 लाख रुपयांचे मूळ अंदाजपत्रक जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी बुधवारी ठराव समितीसमोर मांडले. या अर्थसंकल्पात बांधकाम व समाजकल्याण विभागासाठी भरीव निधी देण्यात आला. दरम्यान, झेडपीच्या इतिहासात पहिल्यादांच सलग चौथ्या वर्षी प्रशासकांनी बजेट सादर केले.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभागृहात प्रशासक याशनी नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली ठराव समितीची सभा झाली. त्यामध्ये नागराजन यांनी 45 कोटी 40 लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. त्यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, निलेश घुले, नागेश ठोंबरे, प्रज्ञा माने, कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी, अमर नलवडे, गौरव चक्के, अरुणकुमार दिलपाक, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, धनंजय चोपडे, अनिस नायकवडी, समाजकल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार, कृषि विकास अधिकारी गजानन ननावरे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे सन 2026- 27 साठी अपेक्षित महसूली जमा 45 कोटी 41 लाख व भांडवली जमा 18 कोटी 92 लाख विचारात घेवून 1 लाख रुपये शिलकीचे व 45 कोटी 40 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले असल्याचे याशनी नागराजन यांनी सांगितले. जि. प. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड दि. 20 मार्च रोजी होत असल्याने सर्वसाधारण सभा बोलावण्यासाठी आवश्यक 12 दिवसाचा नोटीस कालावधी उपलब्ध होत नसल्यामुळे अर्थसंकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
तसेच सन 2025-26 ते अंतिम सुधारीत व सन 2026-27 चे मूळ अंदाजपत्रक हे स्थापन होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पहिल्या सर्व साधारण सभेपुढे अवलोकनार्थ सादर करण्यात येणार आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांनी प्रास्ताविक केले. अर्थसंकल्प तयार करण्यासाठी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्कर्ष कवठेकर, लेखाधिकारी समाधान चव्हाण, योगेश करंजेकर, सहाय्यक लेखाधिकारी सुनील पवार, विश्वनाथ काटकर, जयंत माळी यांच्यासह लेखा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.