Satara ZP: अभिनंदनावरून जिल्हा परिषदेत रणकंदन

विषय समिती निवडी बिनविरोध : तणातणी होताच सत्ताधाऱ्यांचा सभात्याग
Satara ZP
Satara ZPPudhari
Published on
Updated on

सातारा : सातारा जिल्हा परिषदेत शुक्रवारी सर्वसाधारण सभेत विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. या निवडीवर विरोधकांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. मात्र, निवडीनंतर अभिनंदनपर भाषण करताना विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची उणीधुणी काढली. यावरून उपाध्यक्ष राजू भोसले व विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. विरोधक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून सत्ताधाऱ्यांनी सभात्याग केला.

दरम्यान, सत्ताधाऱ्यांनी सभात्याग केल्यानंतर विरोधकांनी सीईओ याशनी नागराजन यांच्या दालनात जावून जाब विचारला. यावेळी सदस्य व सीईओ नागराजन यांच्यातही चांगलीच वादावादी झाली. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात डॉ. प्रिया शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेस उपाध्यक्ष राजू भोसले, शिक्षण सभापती तेजस्विनी कदम, महिला व बालकल्याण सभापती ऋतुजा शिंदे, कृषि समाजकल्याण सभापती ऋषीकेश धायगुडे, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे आदी उपस्थित होते.

विषय समितीच्या सदस्य निवडी या सर्वसमावेशक करण्यात आल्या. या समित्यांमध्ये सर्वच पक्षाच्या सदस्यांना संधी देण्यात आली. सर्वच सदस्यांचे बाके वाजवून अभिनंदन केले. त्यानंतर अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी या सभागृहाने चांगले नेते दिले आहेत. त्यांचे जिल्ह्यासाठी मोठे योगदान आहे. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, या सभागृहांनी सर्वांनी गरिमा राखली पाहिजे, असे आवाहन केले.

त्यानंतर अभिनंदनाचा ठराव मांडताना अनिल देसाई यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी साताऱ्याची प्रतिमा मलिन झाल्याचा व लोकशाहीची हत्या झाल्याचा आरोप केला. त्यावर उपाध्यक्ष राजू भोसले यांनी सध्या फक्त अभिनंदन ठरावावरच बोला, अशी भूमिका घेतली. त्यानंतर सर्वच विरोधकांनी अनिल देसाई यांची बाजू घेत त्यांना बोलू द्या, आमच्यावर दबाव टाकू नका असे सांगत घोषणाबाजी केली. यानंतर उदय कबुले, गिरीश बनकर, राजू शेळके, संदीप मांडवे यांनीही देसाई यांचीच री ओढली. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले. राजू भोसले यांचे विरोधक काही ऐकत नसल्याचे पाहून सत्ताधाऱ्यांनी सभात्याग केला.

सत्ताधारी नसले तरी विरोधकांनी सभागृहात प्रति सभा सुरू केली. तसेच जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर हे सर्व सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या दालनात गेले. त्या ठिकाणी या सदस्यांनी नागराजन यांना उपाध्यक्षांना सभा संपवण्याचा काय अधिकार आहे? यासह विविध प्रश्नांची सरबत्ती केली. सुमारे तासभर सीईओंच्या दालनात गोंधळ सुरू होता. सीईओंनी समाधानकारक उत्तरे न दिल्याचा आरोप करत विरोधकांनी जिल्हा परिषदेच्या पोर्चमध्ये येऊन पुन्हा घोषणाबाजी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news