

खटाव : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या नियुक्ती प्रक्रियेबाबत ग्रामविकास व पंचायतराज विभागाने महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील सुधारणांच्या अनुषंगाने नामनिर्देशित सदस्यांची संख्या निश्चित करण्यासाठी सविस्तर सूचना जारी केल्या आहेत. झेडपीत १० टक्के तर पंचायत समित्यांमध्ये २० टक्के स्वीकृत सदस्य निवडता येणार आहेत. टक्केवारीचा अपूर्णांक अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी असेल तर तो विचारात घेतला जाणार नाही. या निकषाप्रमाणे सातारा झेडपीत ६.५० टक्के म्हणजेच सात स्वीकृत सदस्य निवडता येणार आहेत.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या अखत्यारीतील ग्रामविकास विभागाने यासंदर्भात राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना पाठवल्या आहेत. या नियमानुसार जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेल्या एकूण सदस्यांच्या १० टक्के किंवा किमान पाच सदस्य, यापैकी जी संख्या अधिक असेल तेवढे स्वीकृत सदस्य असतील. तर पंचायत समितीमध्ये निवडून आलेल्या एकूण सदस्यांच्या २० टक्के किंवा किमान एक सदस्य, यापैकी जी संख्या अधिक असेल तेवढे स्वीकृत सदस्य असतील.
स्वीकृत सदस्यांची संख्या निश्चित करताना गणनेत येणाऱ्या अपूर्णांकाबाबतही ग्रामविकास विभागाने स्पष्टता दिली आहे. अपूर्णांक अर्ध्यापेक्षा कमी असल्यास तो विचारात घेतला जाणार नाही, तर अर्धा किंवा त्यापेक्षा अधिक अपूर्णांक असल्यास त्याची एक म्हणून गणना करण्यात येईल. या पद्धतीचा अवलंब जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही ठिकाणी करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
स्वीकृत सदस्यांच्या जागांचे वाटप करताना संबंधित राजकीय पक्ष, गट किंवा आघाडी यांच्या निवडून आलेल्या सदस्यांच्या तौलनिक संख्याबळाचा विचार केला जाणार आहे. जागावाटप करताना पूर्णांक आणि उर्वरित अपूर्णांक विचारात घेण्याची पद्धत स्पष्ट करण्यात आली आहे. दोन किंवा अधिक पक्षांचे अपूर्णांक समान असल्यास सोडतीद्वारे निर्णय घेण्याची तरतूदही करण्यात आली आहे. या नियुक्ती प्रक्रियेत जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाची भूमिका देण्यात आली आहे. संबंधित राजकीय पक्षांच्या नेत्यांशी सल्लामसलत करून पात्र व्यक्तींच्या नावांची शिफारस करण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांनी केलेल्या शिफारशींचा विचार करून संबंधित जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करेल. शिफारस केलेले नाव नाकारल्यास त्याची कारणे लेखी स्वरूपात नोंदवणे आवश्यक राहणार आहे.वैद्यकीय, शिक्षण, कृषी, जलसंधारण, सहकार, ग्रामीण विकास, महिला व बालविकास, कला, साहित्य, समाजकार्य, अभियांत्रिकी आणि विधी अशा विविध क्षेत्रांतील पात्र व अनुभवी व्यक्तींना स्वीकृत सदस्य म्हणून संधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे.