

शशिकांत जाधव
लोणंद : सातारा जिल्ह्यातील हाय व्होल्टेज लढत म्हणून शिरवळ जिल्हा परिषद गटाकडे पाहिले जात आहे. सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय कबुले विरुद्ध जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे -पाटील यांच्यात जरी प्रत्यक्षात लढत होत असली तरी खरी लढत ना. मकरंद आबा पाटील विरुद्ध ना . जयकुमार गोरे यांच्यातच होत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. राष्ट्रवादी बरोबरच भाजपनेही ही लढत प्रतिष्ठेची केली असून हाय व्होल्टेज लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे प्रदीप माने पुन्हा यावेळी आपलं नशीब आजमावत आहेत. त्यामुळे या गटातील तिरंगी लढतीत कोण सिकंदर ठरणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये शिरवळ जिल्हा परिषद गट म्हणजे नितीन भरगुडे -पाटील हे समीकरण तीन दशकामध्ये पाहायला मिळाले होते. परंतु, 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये मात्र राष्ट्रवादीकडून लढणारे नितीन भरगुडे - पाटील यांचा अपक्ष असलेले उदय कबुले यांनी 6 हजार मतांनी दारुण पराभव केला होता. त्यावेळी उदय कबुले यांच्या विजयासाठी त्यावेळी संपूर्ण शिरवळ गावाबरोबरच जिल्हा परिषद गटातील सर्वपक्षीय नेते एकवटले होते. त्यामुळेच उदय कबुले यांनी नितीन भरगुडे -पाटील यांना धोबीपछाड करू शकले होते. परंतु यावेळची लढत मात्र वेगळी पहावयास मिळत आहे.
आतापर्यंत राष्ट्रवादीत असलेले नितीन भरगुडे -पाटील ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपात जाऊन भाजपाकडून उमेदवारी करत आहेत. तर मकरंद पाटील यांनी मात्र अपक्ष असलेल्या उदय कबुले यांना पुन्हा राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून प्रदीप माने पुन्हा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत त्यामुळे या ठिकाणची निवडणूक ही तिरंगी अशी होणार आहे. भाजपाकडून लढणारे नितीन भरगुडे पाटील यांना यांच्या अस्तित्वाची लढाई म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. यावेळी त्यांना मात्र भाजपाच्या नेते व कार्यकर्त्यांची साथ मिळणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये त्यांचा स्वतंत्र असा गट आहे.
या मतदारसंघांमध्ये शिरवळ हे सर्वात मोठे गाव आहे. शिरवळ गावानेच गतवर्षी नितीन भरगुडे - पाटील यांना मोठा धक्का दिला होता. यावेळी मात्र तशी राजकीय परिस्थिती नाही. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना होत आहे. त्यामुळेच आतापर्यंत चार वेळा जिल्हा परिषदेमध्ये गेलेल्या नितीन भरगुडे- पाटील यांचे भवितव्य पुन्हा एकदा शिरवळ शहराच्या मतांवर अवलंबून राहणार आहे. तर गतवेळी उदय कबुले यांना सुमारे 80 टक्के गावाने साथ दिली होती तर यावेळी काय होणार? यावरही बरचसे चित्र अवलंबून राहणार आहे.
खंडाळा तालुक्यामध्ये भाजपचे नेते ना. जयकुमार गोरे यांनी आपली ताकद लावून तिन्ही जिल्हा परिषद गटामध्ये ताकतीचे उमेदवार दिले आहेत. त्यापैकी शिरवळ जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादीचा हुकमी एक्का असलेले नितीन भरगुडे - पाटील यांनाच भाजपात घेऊन एक नवा डाव खेळला आहे. त्यामुळे जयाभाऊ आपला डाव यशस्वी करण्यासाठी मोठी ताकद लावणार आहे हे स्पष्टच आहे. परंतु त्याचबरोबर मकरंद आबांनीही अपक्ष निवडून आलेल्या उदय कबुले यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करून खंडाळ्याला न्याय दिला होता. त्यानंतर पुन्हा त्यांनाच मैदानात उतरून ही लढत प्रतिष्ठेची करून ठेवली आहे. कबुले यांच्या उमेदवारीने राष्ट्रवादीमध्ये काही प्रमाणात धुस - फुस पाहायला मिळाली होती याचा परिणाम काही होणार का हेही पाहावे लागणार आहे.