

सातारा : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्या सातारा जिल्हा परिषदेमध्ये सध्या टिंगल टवाळ्या अन् टिवल्या बावल्यांना ऊत आला आहे. केवळ खाओ पिओ मजा करो असा अधिकारी, कर्मचार्यांचा दिनक्रम सुरू आहे. अधिकार्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांच्या कामाचा बट्ट्याबोळ होत आहे.
जिल्हा परिषदेमध्ये गेले 36 महिने प्रशासक राजवट सुरू आहे. प्रशासक राजवटीमध्ये अधिकार्यांचा हम करे सो कायदा याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागात कामकाज सुरू आहे. या प्रशासक राजवटीत ग्रामीण भागातील विकासाला चांगलीच खीळ बसली आहे. अनेक माजी पदाधिकार्यांना तर अधिकारी ओळखेनासे झाले आहेत. पदाधिकार्यांनी अधिकार्यांना काही कामे सांगितली तरी ती होत नसल्याचे दिसून येत आहे. काही निवडक पदाधिकारी सोडल्यास बहुतांश पदाधिकार्यांनी झेडपीला भेट देणेच बंद केले आहे. त्यामुळे झेडपीत अधिकार्यांची मनमानी वाढली आहे. झेडपीत कामानिमित्त येणारे नागरिक जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून येत असतात. मात्र, त्यांना थातूर मातूर उत्तरे देवून पुन्हा पाठवले जात आहे. वारंवार हेलपाटे मारायला लागल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
वरिष्ठ अधिकार्यांचा झेडपीवर वचक बसला नसल्यानेच विविध विभागातील खातेप्रमुखांचा खाओ पिओ मजा करो असा दिनक्रम सुरू आहे. अनेक खातेप्रमुख कार्यालयात कमी आणि आपल्या निवासस्थांनीच जास्त असे चित्र अनेकदा दिसत आहे. तर काही अधिकारी फिल्ड व्हिजीट व व्हीसीच्या नावाखाली दिवस दिवस गायब असतात. वरिष्ठ अधिकारी व खातेप्रमुखही नसल्याने कर्मचारीही गुल होत आहेत. त्यामुळे नागरिकांना कुणाकडे जावे? असा प्रश्न पडत आहेत. अनेक महाभाग सकाळी थम्ब करून कार्यालयातील कामाचा अंदाज घेवून कलटी मारत आहेत. त्यानंतर थेट सायंकाळीच थम्ब करून घरी जात आहेत. त्यामुळे झेडपीत सध्या सर्व काही अलबेल सुरू असल्याचे चित्र आहे.
लोकप्रतिनिधी असताना अधिकार्यांना शिस्त होती. मात्र, गेले तीन वर्ष लोकप्रतिनिधी नसल्याने त्यांना कामे सांगणारे व विचारणारे कुणीच नसल्याने याचा गैरफायदा अधिकारी व कर्मचारी घेत आहेत. कर्मचार्यांना शिस्त नसल्याने सातार्याच्या नावलौकीकला बट्टा लावण्याचे काम हे अधिकारी करत आहेत. यासाठी वरिष्ठांनी कार्यालयातील कर्मचारी नेमके किती तास काम करतात? हे पाहण्याची वेळ आली आहे.