Satara politics | सातारा जिल्हा परिषदेत भाजप चमत्कार करेल : जयकुमार गोरे

सर्व पर्याय खुले असल्याचे सांगत राष्ट्रवादी-शिवसेनेला आव्हान
Jayakumar Gore
जयकुमार गोरेFile Photo
Published on
Updated on

सातारा : सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरिष्ठ पातळीवरून बोलत आहेत. साताऱ्यात आम्ही महायुती म्हणून पुढे जाऊ, मात्र तसे घडले नाही तर इच्छा नसतानाही आम्ही चमत्कार घडवू, असे खुले आव्हान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांना दिले आहे.

सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे 27 सदस्य निवडून आले आहेत. सत्तास्थापनेसाठी 6 सदस्यांची भाजपला गरज असून राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांनी आपल्या सदस्यांच्या गटांची नोंदणी केली आहे. आता सत्तास्थापनेच्या अनुषंगाने वरिष्ठ पातळीवरून होणाऱ्या घोषणेची वाट पाहिली जात आहे. राष्ट्रवादीने तर आपले 22 सदस्य अज्ञात ठिकाणी पाठवून दिले आहेत. शिवसेनेचेही सदस्य गुरुवारी एकत्रितपणे बाहेरगावी जाण्याच्या तयारीत होते.

दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेत भाजपच सत्ता स्थापन करणार, असा दावा ना. जयकुमार गोरे व ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नूतन सदस्यांच्या सत्कार समारंभात केला होता. सोलापूर दौऱ्यावर असताना माध्यमांच्या प्रतिनिधींनी ना. गोरे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा करण्यासाठी आमच्यासमोर देखील सर्व पर्याय खुले आहेत. निवडणुकीमध्ये आम्ही 27 जागा जिंकल्या एक अपक्ष आमच्यासोबत आहे. महायुती म्हणून आम्ही पुढे जाऊ. मात्र, असे न घडल्यास चमत्कार करुन दाखवू, असे म्हणत महायुतीमधील अंतर्गत संघर्षाला वाट करु दिली आहे.

साताऱ्याच्या सत्तासंघर्षावर राज्याचे लक्ष...

शिवसेना, राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी एकत्र येत अनेक कमराबंद बैठका घेतल्या. नवनिर्वाचित सदस्यही अज्ञातस्थळी पाठवले. राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापन करण्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रीन सिग्नल दिल्याचेही सांगितले जात आहेत. ना. मकरंद पाटील व ना. शंभूराज देसाई यांची ना. शिंदे यांच्यासोबतही चर्चा केली आहे. सातारा जिल्हा परिषदेतील सत्तासंघर्षावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news