Satara Accident : ऊस ट्रॅक्टर व दुचाकी अपघातात युवक ठार

फलटण-लोणंद पालखी महामार्गावरील घटना : एकजण जखमी
Satara Accident News
ऊस ट्रॅक्टर व दुचाकी अपघातात युवक ठार
Published on: 
Updated on: 

साखरवाडी : फलटण-लोणंद पालखी महामार्गावर निंभोरे गावच्या हद्दीत पेट्रोल पंपासमोर उसाने भरलेला ट्रॅक्टर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या २० वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुवर्णदीप सुरेश जगताप (वय २०, रा. रांझे, ता. भोर, जि. पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. या अपघातात त्याचा मित्र रोहित रवींद्र घोगरे (रा. रांझे, ता. भोर) हा जखमी झाला आहे. रविवार दि. २५ ऑक्टोबर रोजी रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुवर्णदीप जगताप आणि रोहित घोगरे हे दोघे स्प्लेंडर दुचाकीवरून (क्र. एमएच १२ डीएन ०८२२) विडणी येथून आपल्या रांझे गावी जात होते. त्यावेळी निंभोरे गावच्या हद्दीत पेट्रोल पंपासमोर त्यांच्या दुचाकीची उसाने भरलेल्या ट्रॅक्टरशी (क्र. एमएच १६ सीक्यू ९७३६) धडक झाली. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक वाहन घटनास्थळी सोडून पसार झाला.

या अपघातात सुवर्णदीप याच्या पायावरून ट्रॅक्टर गेल्याने तो गंभीर जखमी झाला, तर रोहित घोगरे यालाही दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार महादेव पिसे आणि अमोल पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी सुवर्णदीप याला पुढील उपचारासाठी बारामती येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली. रोहित घोगरे याच्यावर खेड-शिवापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मृत सुवर्णदीप याचे मावसभाऊ ऋषिकेश अनंता जगताप (रा. विडणी) यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या अपघाताचा पुढील तपास फलटण ग्रामीण पोलिस करत आहेत.

अडीच महिन्यांपूर्वी वडिलांचे निधन; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

सुवर्णदीपच्या कुटुंबावर नियतीने घाला घातला आहे. अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर आता तरुण मुलाचाही अपघाती मृत्यू झाल्याने त्याची आई आणि बहिणीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाचा तरुण आधार हरपल्याने रांझे गावात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेमुळे पालखी महामार्गावरील उसाने भरलेल्या ट्रॅक्टरची वाहतूक आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news