

सातारा : गोडोली परिसरातील भैरवनाथ मंदिरालगत छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले व्यासपीठाच्या कोपऱ्यात एका युवकाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने शनिवारी सकाळी परिसरात खळबळ उडाली. प्रशांत ऊर्फ गुड्या यशवंत ससाणे (वय 27, रा. कामाठीपुरा) असे मृताचे नाव असून, त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सातारा शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत शोधमोहीम सुरू केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भैरवनाथ मंदिराशेजारील सभागृहाच्या कोपऱ्यात सकाळच्या सुमारास एक तरुण झोपलेल्या अवस्थेत स्थानिकांना दिसला. नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता त्याच्या बाजूला रक्त आढळून आल्याने तातडीने सातारा शहर पोलिसांना माहिती दिली.
घटनास्थळी पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे, एपीआय अनंत कांबळे आणि त्यांच्या पथकाने धाव घेत पंचनामा केला.
सीसीटीव्ही बंदमुळे संशय वाढला
घटनास्थळ परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असले, तरी संबंधित कॅमेरे बंद असल्याची चर्चा परिसरात सुरू होती. त्यामुळे नेमकी घटना कशी घडली, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच प्रशांत ससाणे याचा घातपात केला गेल्याचा संशय बळावला आहे.