

सातारा : राजेवाडी (ता. खंडाळा) येथे १५ दिवसांपूर्वी नाका-तोंडात व डोळ्यांत चटणी टाकून युवतीच्या झालेल्या खुनाचा छडा सातारच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने लावला. वडील व चुलत चुलत्यानेच युवतीचा खून केल्याचे समोर आले असून याप्रकरणी दोघांनाही अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलगी व्यसनी होती. कुटुंबीयांचे ती ऐकत नव्हती यातूनच खून केल्याचा जबाब संशयितांनी दिला आहे. हर्षदा हणुमंत जाधव (वय १९) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे.
याप्रकरणी तिचे वडील हणुमंत दामोदर जाधव (रा. जांभूळवाडी, आंबेगाव खुर्द, ता. हवेली, जि. पुणे), चुलत चुलता बाळू अंकुश जाधव (रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ ) यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी : १४ सप्टेंबर रोजी राजेवाडी येथे निर्जन ठिकाणी सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर एका अनोळखी युवतीचा नाका-तोंडात व डोळ्यांत चटणी टाकलेला मृतदेह मिळून आला होता. शिरवळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल झाला. मृत युवतीची ओळख पटवण्याचे सातारा पोलिसांसमोर आव्हान होते. गेली १४ दिवस पोलिसांनी एका सीसीटीव्हीची बारकाईने पाहणी करून तांत्रिक तपासाद्वारे खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेल्या वाहनाचा माग काढण्यास सुरुवात केली. त्या आधारावर पोलिस संशयितांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.