

सातारा : सातार्यात अनोळखी व्यक्तीने खासगी क्लासला जाणार्या अल्पवयीन मुलीसह विविध ठिकाणी महिलांची छेड काढल्याने शहरात भीतीचे वातावरण होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस रात्रंदिवस संशयिताचा माग काढत होते. अखेर दोन दिवसांनी त्याला शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
विनोद मोहन कामटे (वय ४०, सध्या रा. सैदापूर, ता. सातारा, मूळ रा. जातेगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी : पोवई नाका परिसरात अनोळखी व्यक्तीने खासगी क्लासमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस जवळ बोलावून तिच्यासमोर लैंगिक चाळे केले. या प्रकरणाची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर संशयिताचा सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास सुरू झाला. मुलीसोबत गैरकृत्य केले असताना त्याने आणखी २ ते ३ विविध ठिकाणी महिलांसमक्ष लैंगिक चाळे केल्याचे तसेच छेड काढल्याचे फुटेजवरून स्पष्ट झाले.