Satara Tree Plantation: वृक्षारोपणासाठी महिलांनी आणले डोक्यावरून पाणी

पाणीटंचाईने ग्रासलेल्या धनावडेवाडीतील उपक्रम; सामूहिक श्रमदानातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
Satara Tree Plantation
Satara Tree Plantation: वृक्षारोपणासाठी महिलांनी आणले डोक्यावरून पाणीPudhari
Published on
Updated on

सणबूर : पाणीटंचाईने ग्रासलेल्या पाटण तालुक्यातील धनावडेवाडीत महिलांनी डोक्यावर पाणी वाहून आणले, युवकांनी डोंगरातून बांबू आणून कुंपण उभारले, तर चिमुकल्यांनी रोपे लावून त्यांची जबाबदारी स्वीकारली. सामूहिक श्रमदानातून साकारलेला हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाचा आदर्श नमुना ठरत आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाटण तालुक्यातील वाल्मीक पठारावरील दुर्गम धनावडेवाडी (निगडे) येथे ग्रामस्थांनी एकत्र येत पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला. ओम साई अशोक मित्र मंडळ, धनावडेवाडी यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण मोहिमेत ग्रामस्थ, मुंबईस्थित चाकरमानी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांना हिरवेगार वारसा देण्याच्या उद्देशाने गाव परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे, उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या या दुर्गम वाडीतील ग्रामस्थांनी अडचणींवर मात करत झाडे जगविण्याचा निर्धार व्यक्त केला. झाडांना पाणी मिळावे यासाठी महिला वर्गाने सुमारे 500 मीटर अंतरावरून डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणले. तर युवकांनी डोंगरातून बांबू आणून नव्याने लावलेल्या रोपांच्या संरक्षणासाठी कुंपण उभारले.

चिमुकल्यांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाने झाडे लावण्याबरोबरच ती जगविण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. आज लावलेली ही रोपे उद्या परिसराला हिरवाई, शुद्ध हवा आणि पर्यावरणीय समृद्धी प्रदान करतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news