

कोरेगाव : रहिमतपूर परिसरातील ज्योतिबा माळ म्हसवडकी शिवारात उसाच्या शेतात महावितरणची उच्चदाबाची वीजवाहिनी तुटून पडल्याने विजेचा धक्का लागून ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. कमल सतीश माने असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेत उसाचे पीकही जळून नुकसान झाले.
याबाबत रोहित उदय माने यांनी रहिमतपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. रविवारी दुपारी रोहित माने हे शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी उसाच्या शेताला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आग आटोक्यात आणण्यासाठी शेताकडे गेले असता कमल माने या शेतात निपचित अवस्थेत दिसून आल्या. त्याचवेळी शेताजवळ महावितरणची वीजवाहिनी तुटून जमिनीवर पडल्याचेही आढळून आले.
परिसरातील नागरिकांच्या मदतीने कमल माने यांना रहिमतपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. वीजवाहिनी तुटून पडल्याने विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, शॉर्टसर्किटमुळे उसाच्या शेताला आग लागल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तलाठी निवृत्ती हुले यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार, उच्चदाबाची विद्युतवाहक तार तुटून झालेल्या शॉर्टसर्किटमुळे एक एकर क्षेत्रांतील ऊस पिकाचे सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेत जीवितहानी होऊनही महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.