Satara Cyber Crime : महिलेला साडेआठ लाखांचा गंडा

पोलिस अधिकारी असल्याचे भासवले
Cyber Crime
Cyber CrimePudhari
Published on: 
Updated on: 

सातारा : पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करून बँक खात्यातील पैशांची पडताळणी करण्याच्या बहाण्याने सायबर भामट्याने क्षेत्र माहुली येथील एका महिलेला सुमारे ८ लाख ६० हजार रुपयांचा गंडा घातला. व्हिडीओ कॉलद्वारे विश्वास संपादन करत आरटीजीएसद्वारे महिलेच्या खात्यातील रक्कम स्वतःच्या खात्यावर वळवली. याप्रकरणी विद्या रामजी पवार (वय ५२) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली .

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवार यांना ३० सप्टेंबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत दोन विविध मोबाईल क्रमांकांवरून फोन आले. पहिल्या फोनवर संबंधिताने पोलीस हवालदार असल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरून व्हिडीओ कॉल करून एका व्यक्तीने आयपीएस अधिकारी मनोज शर्मा असल्याची बतावणी केली. बँक खात्यातील रकमेची पडताळणी करायची असून, काळ्या पैशासंदर्भात चौकशी सुरू असल्याचे सांगत या भामट्याने पवार यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्या खात्यातून आरटीजीएसद्वारे प्रथम ५ लाख ६० हजार रुपये आणि नंतर आणखी ३ लाख रुपये अशा एकूण ८ लाख ६० हजार रुपयांची रक्कम परस्पर दुसऱ्या खात्यात वळवून घेतली.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पवार यांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक एस. जी. म्हेत्रे पुढील तपास करत आहेत.

पोलिस अधिकारी असल्याची बतावणी, व्हिडीओ कॉल आणि बँक खात्याच्या पडताळणीचा बहाणा अशा प्रकारे सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना लक्ष्य केले जात असल्याने अनोळखी व्यक्तींना बँक खात्याची माहिती किंवा त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करू देऊ नयेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.