

शिवथर : शिवथर (ता. सातारा) येथे अज्ञाताने महिलेचा सोमवारी दुपारी धारदार हत्याराने भरदिवसा गळा चिरुन खून केला. पूजा प्रथमेश जाधव (वय 25, रा. शिवथर) असे मृत महिलेचे नाव असून, घटनेनंतर हल्लेखोर पसार झाला आहे. या घटनेमुळे शिवथर हादरले असून, खून कोणी केला? कारण काय? याबाबत रात्री उशिरापर्यंत गूढ होते.
याबाबत अधिक माहिती अशी, पूजा जाधव यांना एक मुलगा असून, घरी सासू, सासरे, पती, मुलगा असे एकत्र शिवथर पासून 1 किलोमीटर अंतरावर राहत आहेत. पती प्रथमेश जाधव हे सातार्यात कामाला असून, ते नेहमीप्रमाणे सोमवारी कामावर गेले. सासू-सासरेही दुपारी 12 च्या सुमारास रानात कामाला गेले होते. मुलगा शाळेला गेला होता. यामुळे पूजा या घरी एकट्याच होत्या. जाधव यांच्या शेजारी राहणार्यांनी घराचा दरवाजा उघडा असल्याने हाक मारली. मात्र, जाधव यांच्या घरातून कोणताही प्रतिसाद आला नाही. यामुळे आत जाऊन पाहिले असता, पूजा या बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांनी ही बाब पूजाच्या सासू-सासर्यांना व पतीला फोनवरून सांगितली. दुपारी अडीच वाजता ते घरी आले.
माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव पंचनामा करुन ठसे तज्ञ, श्वान पथकाला पाचारण केले. यानंतर सायंकाळी उशीरा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हीलमध्ये नेला. प्राथमिक माहितीनुसार धारदार शस्त्राने गळ्यावर वार झाल्याने पूजा यांचा मृत्यू झाला आहे. रात्री उशीरापर्यंत शवविच्छेदन सुरु होते. तोपर्यंत पोलिसांनी माहिती घेवून तपासाला सुरुवात केली. तांत्रिक तपासासह परिसरातील ग्रामस्थांकडून माहिती घेण्याची प्रक्रिया सुरु केली. पोलिसांची तीन पथके तपासासाठी तैनात करण्यात आली. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.