

वाई : उन्हाच्या कडाक्याने त्रस्त झालेल्या वाईकरांना आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला रविवारी झालेल्या दमदार पावसाने दिलासा दिला. मात्र, याच पहिल्या पावसाने वाई नगरपालिकेच्या विकासाच्या दाव्यांचा फुगा अक्षरशः फुटला. 'ग्रामीण रुग्णालय ते किसनवीर चौक हा शहरातील प्रमुख रस्ता काही मिनिटांतच नदीत रूपांतरित झाला. यामुळे पहिल्याच पावसात पालिकेच्या विकासाची पोलखोल झाली. रस्ता व नाल्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे दुचाकीस्वावर व कार चालक अडकून पडल्याचे चित्र दिसून आले.
नगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून बंदिस्त गटारे, सिमेंट रस्ते आणि सुशोभीकरणाची कामे केली. मात्र, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक नियोजनच केले नसल्याचे पहिल्याच पावसाने उघड केले. रस्त्यांवर पाणी साचल्याने विकासकामांच्या गुणवत्तेवर आणि प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या काळात विकासाच्या गप्पा मारून मते मागणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन आज मात्र नागरिकांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करत आहे. फक्त बंदिस्त गटारे आणि चकाचक रस्ते म्हणजे विकास नव्हे; त्या रस्त्यावरचे पावसाचे पाणी जाणार कुठे? हा संतप्त सवाल आज शहरातील प्रत्येक चौकात उपस्थित केला जात आहे.
आजच्या पावसातच अशी परिस्थिती निर्माण होत असेल, तर पुढील मुसळधार पावसात अनेक भागांमध्ये पाणी थेट घरात शिरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने उपाययोजना करावी. अन्यथा मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते.