

सातारा : अडखळणाऱ्या मान्सूनने पुन्हा एकदा जिल्ह्याच्या पश्चिम भागात संततधार पावसाला सुरुवात केली. रविवारी सकाळपासून वाई, महाबळेश्वर, जावली, सातारा, कराड, पाटण या पश्चिमेकडील तालुक्यांमध्ये पावसाच्या सरीवर सरी कोसळल्या. त्यामुळे जनजीवन चिंब झाले असून, धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, निसर्गाने रूपडे पालटले असून कास, ठोसेघर, यवतेश्वर, महाबळेश्वर व पाचगणी परिसरात पावसाळी पर्यटनाला बहर आला आहे.
गेले काही दिवस पावसाने विश्रांती दिली होती. मात्र, शनिवारी रात्रीपासून पावसाच्या सरी पुन्हा कोसळू लागल्या आहेत. जिल्ह्याच्या सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पश्चिम भागातील डोंगररांगामध्ये छोटे - मोठे धबधबे ओसंडून वाहात आहेत.
पश्चिम भागात भात लावणीची कामे युध्दपातळीवर सुरू आहेत. भात लावणीची कामे सुरू असली तरी अजूनही मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. खरीप हंगामातील पिकांना पावसाने जीवदान मिळाले आहे. अगाप पेरणी केलेली पिके समाधानकारक आहेत; तर काही ठिकाणी आडसाली उसाच्या लावणी युद्धपातळीवर सुरू आहेत. पश्चिम भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने कोयना, धोम, बलकवडी, उरमोडी, कण्हेर धरणातील पाणी पातळीत वाढ होत आहे. दरम्यान, कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार कायम आहे. त्यामुळे रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून कण्हेर धरणाच्या विद्युतगृहातून ५०० क्युसेक विसर्ग वेण्णा नदी पात्रात सोडण्यात आला.