

कोरेगाव : वाठार किरोली, ता. कोरेगाव येथे जुन्या भांडणाच्या रागातून दोघांनी संगनमताने एका तरुणावर चाकू व लोखंडी पाईपने हल्ला करून निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. सतीश भगवान साळवे (वय ३४) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी रहिमतपूर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अक्षय पवार (रा. विटा, जि. सांगली) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दुसऱ्या संशयित आरोपीचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोकुळ भगवान साळवे (वय २७, सध्या रा. कल्याण, जि. ठाणे; मूळ रा. वाठार किरोली) यांचा मोठा भाऊ सतीश साळवे याचे शुभम रमेश नलवडे (रा. वाठार) व त्याचा दाजी अक्षय पवार यांच्याशी पूर्वी भांडण झाले होते. गुरुवारी रात्री ९.३० च्या सुमारास वाठार किरोली गावच्या हद्दीत वाठार ते आर्वी जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली. आरोपींनी सतीश याच्यावर चाकूने छाती, पोट व पाठीवर वार केले. त्यानंतर लोखंडी पाईपने मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले. या हल्ल्यात सतीशचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच रहिमतपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शुक्रवारी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला चाकू व लोखंडी पाईप पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणी अक्षय पवार याला ताब्यात घेण्यात आले असून, दुसऱ्या संशयित आरोपीचा शोध सुरू आहे. घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री तेरणी यांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सपोनि विनोद नेवसे व पोलिस उपनिरीक्षक एम. एम. खान यांनीही घटनास्थळी भेट दिली.