

सातारा: लिंब -ढगेवाडी (ता.सातारा) येथे असलेल्या जलधारा वॉटरपार्क येथे ऋषीकेश गोपाळ साळुंखे (वय 27, रा. कुशी, नागेवाडी ता.सातारा) या युवकाचा मृत्यू झाला. दि. 17 मे रोजी दुपारी ही घटना घडली आहे.
ऋषीकेश साळुंखे हा वॉटर पार्कमधील पाण्यात असताना त्याला त्रास होवू लागला. ही बाब इतरांच्या लक्षात आली. यामुळे तात्काळ त्याला बाहेर काढण्यात आले. मात्र तो बेशुध्द झाला. उपचारासाठी सिव्हीलमध्ये दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. सातारा तालुका पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे. ऋषीकेश हा साताऱ्यात वेल्डर म्हणून काम करत आहे. तो अविवाहित असून त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. सिव्हीलमध्ये शवविच्छेदन करण्यात आले असून अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.