

वाई : वाई तालुक्याचा पश्चिम भाग हा निसर्गाने समृद्ध असून पाच तालुक्यांना पाणी देणारे धोम-बलकवडी धरण आहे. मात्र, अशी परिस्थिती असताना तालुक्यातील 4 गावे व 6 वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे धरण उशाला अन् कोरड घशाला, अशी नागरिकांची अवस्था झाली आहे.
वाई तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस होऊनही काही भागांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ही नैर्सगिक पाणीटंचाई नसून कृत्रिम पाणीटंचाई आहे. टंचाई वाढल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मूलभूत पाणीपुरवठा सुविधांकडे झालेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांना टँकरच्या भरवशावर राहण्याची वेळ आली आहे. सध्या तालुक्यातील चार गावे आणि सहा वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा आहे. यामुळे या गावातील साडे चार हजार लोकांना टँकरची वाट पहावी लागत आहे. याशिवाय दोन हजारांहून अधिक जनावरेही या पाण्यावर अवलंबून आहेत. दीर्घकालीन उपाययोजना न करता केवळ टँकर पुरवठ्यावर भर दिला जात असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
गुंडेवाडी, मांढरदेव, बालेघर आणि आनंदपूर या भागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. आता मे महिना सुरू झाला असून टंचाईची तीव्रता वाढत आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकर सुरू करण्यासाठीच्या प्रस्तावाची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात टँकरच्या संख्येत वाढ होणार आहे. यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे.