

वाई : वाई तालुक्यात वळवाच्या पावसाच्या तडाख्याने शेतात चिखल तयार झाला आहे. त्यामुळे मशागत करण्यात अडचणी येत आहेत. शेतात सर्वत्र पाणी व चिखल असल्याने खरीप हंगामातील पेरण्या रखडल्याचे चित्र आहे. पावसामुळे शेतीला वापसा येत नसल्याने पाऊस उघडण्याची प्रतीक्षा शेतकर्यांना करावी लागत आहे. त्यामुळे तालुक्यात होणारी बाजरी, ज्वारी, घेवडा, मुग, सोयाबीन या पिकांची पेरणी लांबणीवर पडली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतात गुडघाभर पाणी साठले आहे. शेतातून पाणीच बाहेर निघत नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत. थोड्याच दिवसात पावसाची उसंत न मिळाल्यास पेरणी उशिरा करावी लागणार आहे. त्यामुळे खरीप हंगामातील कडधान्ये उत्पन्नावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. सध्या बागायती पिकांना चांगलाच फटका बसला असून सततच्या पडणार्या पावसामुळे उस, हळद, आले, मका ही पिके कुजण्यास सुरुवात झाली आहे. तरी वाईच्या कृषी विभागाने वाई तालुक्यातील शेतकर्यांना योग्य मार्गदर्शन करावे.
गेल्या पंधरा दिवसांत पडलेल्या पावसामुळे पेरणी लांबली आहे. यामुळे वर्षभराचे नियोजन बिघडण्याची भीती आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने कमी पाण्यावर येणारी पिके अतिवष्टीमुळे वाया जाण्याची भीती आहे. भात शेतीला हे वातावरण पूरक असले तरीही भूस्खलन झाल्याने शेतकर्यांमध्ये भीती आहे. बागायती क्षेत्रात वळवाच्या पावसामुळे भाजीपाला मातीमोल झालेला आहे. उस, हळद, आले या सारख्या नगदी पिकांवर रोगांचा पार्दुर्भाव दिसून येत आहे.