

वाई : सोन्या-चांदीच्या व्यवहारातील वजन आणि शुद्धतेच्या पारदर्शकतेचा प्रश्न चर्चेत असतानाच आता वाई शहरातील खासगी सावकारीच्या व्यवहाराबाबतही उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. आर्थिक अडचणीच्या काळात तातडीने पैसे मिळावेत म्हणून अनेकजण खासगी व्यक्तींकडून व्याजाने कर्ज घेतात.
मात्र, हा व्यवहार नियमित व्यवसायाच्या स्वरूपात होत असेल, तर संबंधितांकडे वैध सावकारी परवाना आहे का? आकारले जाणारे व्याज कायदेशीर मर्यादेत आहे का? तसेच व्यवहाराची पावती व लेखी हिशेब दिला जातो का? असे सवाल उपस्थित होत आहेत.
घरातील आजारपण, मुलांचे शिक्षण, व्यवसायातील अडचणी, लग्न समारंभ किंवा अचानक आलेले आर्थिक संकट यामुळे गरजवंत खासगी कर्जाचा आधार घेतात. मात्र, कर्ज घेतल्यानंतर मूळ रकमेपेक्षा व्याजाचा बोजा वाढत असल्याच्या तक्रारी असतील, तर त्याची चौकशी कोण करणार? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. गरजवंताच्या अडचणीचा फायदा घेतला जातोय का? कोण किती रक्कम देतो, किती व्याज आकारतो, व्याज मासिक आहे की अन्य पद्धतीने घेतले जाते, मूळ रक्कम आणि व्याजाची स्वतंत्र नोंद ठेवली जाते का, याची तपासणी होण्याची गरज आहे.
काही ठिकाणी गरजू व्यक्तींना मोठ्या टक्केवारीने पैसे दिले जात असल्याची चर्चा आहे. कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवण्यापूर्वी संबंधितांचे परवाने, प्रत्यक्ष व्यवहार, खातेवही, पावत्या आणि आकारले जाणारे व्याजदर तपासावेत. तक्रारी खोट्या असतील तर प्रशासनाने वस्तुस्थिती जनतेसमोर स्पष्ट करावी आणि नियमबाह्य सावकारी आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करावी.
सोन्याचा ग्रॅम अन् पैशाचा रुपया; हिशेब पारदर्शक हवा
ग्राहकाच्या सोन्याचा एक-एक ग्रॅम आणि कर्जदाराच्या पैशाचा एक-एक रुपया, दोन्हींचा व्यवहार कायद्याच्या चौकटीत आणि लेखी पुराव्यासह झाला पाहिजे. वाई शहरातील सराफा बाजार तसेच खासगी सावकारी व्यवहारांबाबत नागरिकांकडून तक्रारी आणि चर्चा होत असतील, तर प्रशासनाने व्यापक तपासणी मोहीम राबवून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी जोर धरत आहे.