Wai Fire : वाईत गणेशमूर्ती कारखान्याला आग; तयार मूर्ती, कच्चा माल जळून खाक

कोट्यवधींचे नुकसान
Wai Fire
Wai Fire
Published on
Updated on

वाई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना वाई एमआयडीसी परिसरातील प्लॉट क्रमांक १८ येथील ‘वैभव आर्ट हस्तकला महिला उद्योग’ या गणेशमूर्ती कारखान्याला मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत तयार गणेशमूर्ती, गौरी-गणपतीच्या मूर्ती, कच्चा माल व इतर साहित्य जळून खाक झाले. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारखान्यात मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्ती तयार करून त्यांना अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू होते. त्यामुळे कारखान्यात तयार मूर्ती तसेच मोठ्या प्रमाणात कच्चा माल व अन्य साहित्याचा साठा होता. आग लागल्यानंतर काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण कारखान्याला विळखा घातला.

आगीची माहिती मिळताच वाई, पाचगणी, महाबळेश्वर, भुईंज व सातारा येथून पाच अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्री दहाच्या सुमारापासून आग आटोक्‍यात आणण्‍यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. पाच ते सहा तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

मात्र, तोपर्यंत कारखान्यातील तयार गणेशमूर्ती, गौरी-गणपतीच्या मूर्ती, कच्चा माल व अन्य साहित्य जळून खाक झाले होते. या दुर्घटनेमुळे बावळेकर कुटुंबीयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, गणेशोत्सवाच्या तोंडावर त्यांच्यावर संकट कोसळले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकारी व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आगीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा व पुढील कार्यवाही सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news