

वाई : वाई औद्योगिक वसाहतीतील अथर्व फॉन्ड्रीमध्ये सोमवारी पहाटे मशिनच्या बेल्टमध्ये अडकून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. काम करत असताना मशिनच्या बेल्टमध्ये हात अडकून तो मशिनमध्ये ओढला गेला. जयप्रकाश शिवपतती निषाद (वय २३) असे मृताचे नाव आहे.
काही महिन्यांपूर्वीच याच कंपनीत एका कामगाराने भट्टीत उडी मारून आत्महत्या केली होती. यामुळे सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जयप्रकाश हा सँडप्लॅन्ट विभागात काम करत होता. सोमवारी पहाटे सुमारे ३.४० वाजता काम सुरू असताना त्याचा हात मशिनच्या बेल्ट क्रमांक ११ मध्ये अडकला आणि तो मशिनच्या आत ओढला गेल्याने गंभीर जखमी झाला.
घटना लक्षात येताच तेथील कामगारांनी मशिनचा बेल्ट लूज करून जयप्रकाशला बाहेर काढले. त्यानंतर तातडीने ॲम्ब्युलन्सद्वारे त्याला वाई ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मृत जयप्रकाश निषाद हा सध्या अनपट वस्ती, वाई येथे राहत होता. तो मूळचा उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. या घटनेची खबर चंद्रकांत सदाशिव खामकर यांनी दिली.