Satara News: सातारा-वाढे रस्ता डेंजरझोन; अपघात वाढले

वाहनांचे सांगाडे अन् माणसांची हाडे खिळखिळी : दुरूस्ती नको नव्याने रस्ता करा
Satara News: सातारा-वाढे रस्ता डेंजरझोन; अपघात वाढले
Published on
Updated on

सातारा : शहरापासून हाकेच्या अंतरावरील वाढे फाटा ते वाढे गावठाण दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. उखळीच्या खड्ड्यांमधून वाट काढताना वाहनांचे सांगाडे अन् माणसांची हाडे खिळखिळी होत आहेत. त्यामुळे हा ५०० मीटरचा पॅच डेंजर झोनच ठरत आहे. पावसाची संततधार अन् खड्ड्यांची शृंखला यामुळे या रस्त्यावरील प्रवास जीवघेणा झाला आहे. वाढे पंचक्रोशीतील नागरिकांकधून तीव्र संताप व्यक्त होत असून वारंवार पॅचिंगऐवजी डांबरीकरण कामाचा दर्जा सुधारावा, अशी मागणी होत आहे.

वाई, फलटण, कोरेगाव, सातारा या चार तालुक्यातून सातारा शहराकडे होणारी वाहतूक ही लोणंद- सातारा मार्गावरुन होते. खुश्कीचा तसेच टोल बचतीसाठी सातारा लोणंद मार्गावरुन अवजड वाहतूक होते. सातारा तालुक्यातील ३६ गावांच्या दळण-वळणांसाठी हा मुख्य मार्ग असल्याने नेहमीच वाहनांची वर्दळ असते. या मार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम जोमात सुरु असून व उन्हाळ्यामध्ये वाढे फाटा ते पाटखळमाथा या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले आहे. वाढे जुन्या पुलाशेजारी नवीन पूल उभारणीचे काम सुरु झाले आहे.

सध्या या परिसरातील सुमारे ५०० मीटर अंतरात शेकडो खड्डे पडले आहेत. त्यामध्ये पावसाचे पाणी साठल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहने जोराने आदळत आहेत. त्यामुळे वाहनांचे नुकसान होत असून वाहनांमधून प्रवास करणार्‍यांचे मणके ढिले होत आहेत. अनेकांना कंबर, पाठदुखीसह मणक्याचे दुखणे उद्भवत आहे. तसेच एसटी बसेस, मालवाहतूक वाहने हेलकावे घेत असल्याने ती रस्त्यावर कलंडतील की काय अशी धडकी सहप्रवाशांना भरत आहे. त्यामुळे जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे.

वाढे बसथांब्यासमोर भले मोठे खड्डे असल्याने वाहनधारकांचा जीव टांगणीला लागत आहे. वाढे बसस्थानक ते वाढे उड्डण पूल यादरम्यानच्या रस्ता डेंजर झोन ठरत असून महामार्ग प्राधिकरणाने या खड्ड्यांची दुरुस्ती त्वरीत व दर्जात्मक करावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news