

खेड : सातारा शहराचे प्रवेशद्वार असलेल्या वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसामुळे झालेली मोठ-मोठी डबकी आणि रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था असल्याने येथील रस्ता प्रवासासाठी धोकादायक झाला आहे. या रस्त्यावर अर्धा फुटांचे खोल खड्डे आहेत. त्यामुळे वाहने आपटली जात आहेत. तर पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
पुणे-बंगळूर महामार्गावरील वाढे फाटा व बॉम्बे रेस्टॉरंट चौक हे सातार्याचे प्रवेशद्वार आहे. या मार्गानेच महामार्गावरील तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील वाहने सातारा शहरात येत असतात. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. मात्र खड्डे, पाण्याची तळी, वाहतूक कोंडी यामुळे हे प्रवेशद्वारच समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. येथील चौकात येताना वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
सध्या येथील उड्डाणपुलाखाली सेवा रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले असून पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्याने ठिकठिकाणी डबकी तयार झाली आहेत. सुमारे अर्धा फुट खोल खड्ड्यात वाहने आदळून वाहनांचे टायर फुटत आहेत. तर खड्ड्यांचा अंदाज न आल्याने रात्रीच्या वेळी अपघात होऊन काही दुचाकी वाहनचालक जायबंदी झाले आहेत.
वाहन चालवताना खड्डा दिसलाच तर अचानक ब्रेक लावल्याने दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर वाहनांचे पार्ट खिळखिळे होत आहेत. येथील खड्ड्यांची भीषणता दिवसेंदिवस वाढत असून रस्ता प्रवासासाठी धोकादायक झाला आहे. वाढे चौकात कित्येक वर्षांपासून गटारांची समस्या सतावत आहे. गटाराचे चेंबर फुटल्याने वर्षभर गटारगंगा रस्त्यावर वाहत असते. याच गटाराच्या दुरुस्तीसाठी खोदकाम करण्यात आले.
सध्या मातीच्या भरावाने मुजवलेल्या खड्ड्यावर पावसाच्या पाण्याने चिखलाचा राडारोडा झाला आहे. तर चिखलातून वाहने दामटवत वाहनचालक जात असून पुन्हा मोठा खड्डा पडण्याची शक्यता आहे. चौकातील अवजड वाहने व पावसाने रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून चौकातील जीवघेणे खड्डे मुजवण्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नगरपरिषद दुर्लक्ष करत आहे.