

सातारा : प्रत्येक गावातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी शुध्द पाणीपुरवठा व्हावा म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून जलस्त्रोतांची तपासणी केली जात आहे. काही वेळेस ही तपासणी विलंबाने होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शासनाने गावात पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता गावातीलच पाणीपुरवठा समितीच्या प्रशिक्षित महिला फिल्ड टेस्ट किटद्वारे करत आहेत. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता गावस्तरावर कळणार असल्याने पुढील उपाययोजना करणार आहेत.
ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाला शुद्ध, पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा करणे ही ग्रामपंचायतीची प्राथमिक जबाबदारी आहे. परंतु, अनेकदा विविध कारणांमुळे पाणी प्रदूषित होते आणि गावात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. म्हणूनच पाणी गुणवत्ता व्यवस्थापन, नियमित सर्वेक्षण आणि गावातील जबाबदार घटकांची भूमिका समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दुषित पाण्यामुळे अनेकदा गंभीर आजार पसरतात. यासाठी गावोगावी पिण्याच्या पाण्याच्या विविध स्त्रोताची तपासणी फिल्ड टेस्ट किटद्वारे करण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यात २ हजार ५३२ पाण्याचे स्त्रोत आहेत. १ हजार ७४२ गावामध्ये प्रत्येकी पाच महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुमारे ८ हजार ७१० महिला फिल्ड टेस्ट किटद्वारे विहिरी, बोअरवेल, नळपाणी पुरवठा योजना तसेच सार्वजनिक पाणवठ्यांमधील पाण्याची गुणवत्ता तपासली जात आहे. गावातील जलस्रोत स्वच्छ ठेवून, नियमित क्लोरिनेशन आणि योग्य सर्वेक्षणाच्या माध्यमातून आपण आपल्या गावाला जलजन्य आजारांपासून मुक्त ठेवू शकतो. यामध्ये सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक आणि स्वच्छता समितीचा सक्रिय सहभाग हाच खऱ्या अर्थाने महत्वाचा आहे.
गुणवत्तेच्या निकषांची प्राथमिक तपासणी केली जात आहे. तपासणीत पाण्याच्या गुणवत्तेबाबत काही त्रुटी आढळल्यास संबंधित ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या जात आहेत.
अशुध्द पाणीपुरवठा होण्याची कारणे...
पाणी कर्मचाऱ्यांमध्ये शुद्धीकरणाच्या योग्य कौशल्यांची कमतरता असणे. स्त्रोताजवळील अस्वच्छता, पाण्याच्या स्त्रोताजवळ कपडे-भांडी धुणे, जनावरे धुणे, सांडपाणी सोडणे किंवा खतखड्डे व शौचालये असणे, पाईपलाईन, व्हॉल्व किंवा पाण्याच्या टाकीमध्ये गळती असणे, तसेच खाजगी नळजोडणी गटारातून/नालीतून देणे, शेतातील रासायनिक खते, कीटकनाशके आणि कारखान्यांमधील रसायने पाण्यात मिसळणे, ब्लीचिंग पावडरची चुकीची साठवणूक आणि अयोग्य डोस ही अशुद्ध पाणीपुरवठा होण्याची मुख्य कारणे आहेत.