Satara News | वेण्णा लेकच्या नवीन जेट्टीचे काम रेंगाळले
महाबळेश्वर : महाबळेश्वर पर्यटनस्थळाचे प्रमुख आकर्षण वेण्णालेक नौकाविहारावरील जुन्या तरंगत्या लोखंडी जेट्टी अखेरच्या घटक मोजत आहे. या जेट्टीची दुरवस्था झाल्यामुळे पर्यटकांना कसरत करावी लागत आहे. महाबळेश्वर पालिकेच्या वतीने नवीन जेट्टीचे काम सुरू करण्यात आले आहे. मे महिन्याचा पर्यटन हंगाम व महाबळेश्वर महोत्सवापूर्वीच पूर्णत्वास जाणार होते. मात्र हे काम रेंगळले असून नवीन जेट्टीसाठी दिवाळी हंगामाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
वेण्णालेक हे पर्यटकांचे मुख्य आकर्षणाचे ठिकाण आहे. येथे दररोज हजारो पर्यटक नौकाविहाराचा आनंद लुटण्यासाठी येतात. महाबळेश्वर येथे पर्यटनास येणारा पर्यटक वेण्णालेक येथे आवर्जून भेट देतो. पालिकेच्या अखत्यारीत वेण्णालेकचे व्यवस्थापन आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या वेण्णालेक तलावावर असलेल्या तरंगत्या जेट्टीची दूरवस्था झाली आहे. या जेट्टीवरून जा ये करताना पर्यटकांना सहन करावा लागतो. तुटलेला पत्रा, जेट्टीच्या बाजूला सुरक्षेततेच्या दृष्टीने असलेले रेलिंगची दुर्दशा, गंजलेले लोखंड, ठिकठिकाणचे निघालेले नटबोल्टमुळे ही जेट्टी अखेरच्या घटका मोजत आहे.
यावर पालिकेच्याने तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करून नवीन नटबोल्ट टाकून काम चालवले जात होते. गेल्या तीन-चार वर्षांपासून नवीन जेट्टीची मागणी होत होती. मात्र, पालिकस्तरावर निधी उभारण्यासाठी प्रयत्न न झाल्याने नवीन जेट्टीचा विषय रेंगाळला होता. परंतु, मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी हा विषय मार्गी लावला असून परिसराचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. वेण्णालेक तलावामागील मोकळ्या जागेमध्ये एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच नवीन आकर्षक निळ्या रंगाची तरंगती जेट्टीचे काम ठेकेदारामार्फत सुरु करण्यात आले होते.
मे महिन्याच्या उन्हाळी हंगामामध्ये व महाबळेश्वर महा पर्यटन उत्सवाआधी हे काम पूर्णत्वास जाऊन आकर्षक नवीन जेट्टीमुळे वेण्णालेकच्या वैभवात भर पडणार अशी अशा होती. मात्र नवीन जेट्टीचे काम पुन्हा रखडले असून आता पर्यटकांना पुढील दिवाळी पर्यटन हंगामाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे सध्यातरी जुन्या तुटलेल्या दयनीय अवस्थेतील जेट्टीवरूनच मार्गक्रमण करावे लागणार असल्याचे दिसत आहे.

