

सातारा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाच्यावतीने वडूज, पुसेगाव, दहिवडी व फलटण मार्गावर विना वाहक विना थांबा बसेस दि. ९ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. या बसेसमुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
सध्या सुरू असलेल्या सर्व शटल फेऱ्या ठेवून वडूज-पुसेगाव-सातारा, दहिवडी-पुसेगाव-सातारा व फलटण-सातारा मार्गावर विनाथांबा विना वाहक फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. वडूज-सातारा मार्गावर सकाळी ७ वाजता, ८ वाजता, ९ वाजता, ११ वाजता, १२ वाजता व १ वाजता तर सातारा-वडूज मार्गावर सकाळी ९ वाजता, १० वाजता, ११ वाजता, १ वाजता, २ वाजता ३ वाजता सुटणार आहेत. दहिवडी-सातारा मार्गावर सकाळी ६.३०, ७.३०, ८.३०,१०.४०, ११.४० व १२.४० वाजता तर सातारा- दहिवडी मार्गावर सकाळी ८.४०,९.४०, १०.४०, १२.४०,१.४०, २.४० वाजता सुटणार आहेत. वडूज-सातारा व दहिवडी -सातारा या फेऱ्यांना पुसेगाव येथे जाता येता थांबा दिला आहे.
फलटण- सातारा मार्गावर सकाळी ७ वाजता ८ वाजता. ९, ११.२० वाजता, १२.२० वाजता, १.२० वाजता तर सातारा-फलटण मार्गावर सकाळी ९.३० वाजता, १०.३० वाजता, ११.३० वाजता, १.३० वाजता, २.३० वाजता, ३.३० वाजता बसेस सुटणार आहेत. प्रवाशांनी या विना थांबा , विना वाहक फेऱ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी केले आहे.