

सातारा : प्राथमिक शिक्षकांच्या बदलीप्रक्रियेवेळी सादर केलेल्या वैद्यकीय प्रमाणापत्रामध्ये अनियमितता आढळून आल्याने शिक्षक श्रीकांत दोरगे व पदवीधर शिक्षक सुरेखा वायदंडे यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी निलंबित केले असून, एकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश बजावला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची ऑनलाईन कार्यवाही सध्या सुरू आहे. बदलीमध्ये सूट मिळावी, यासाठी शिक्षकांनी विविध वैद्यकीय प्रमाणपत्रे जोडली होती. मात्र, या प्रमाणपत्रामध्ये अनियमितता असल्याच्या कारणावरून तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या. त्यानंतर या प्रमाणपत्राची तपासणी करण्याकरिता जिल्हा परिषदेमध्ये वरिष्ठ अधिकार्यांची समिती गठीत करण्यात आली होती. समितीने प्रशासनाला अहवाल सादर केल्यानंतर पुन्हा ही वैद्यकीय प्रमाणपत्रे तपासण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याकडे देण्यात आली होती. त्यांच्याकडून दर सोमवारी जिल्हा परिषद प्रशासनाला अहवाल येत आहे. त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागामार्फत कारवाई करण्यात येत आहे.
जि. प. शाळा आगाशिवनगर ता. कराड येथील पदवीधर शिक्षिका सुरेखा प्रभाकर वायदंडे यांनी बदली प्रक्रियेत विशेष संवर्ग 1 मधून विविध आजारांची व दिव्यांगत्वाची सादर केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी केली असता त्यांचे दिव्यांग प्रमाण 16 टक्के आढळून आलेे आहे. तसेच हे दिव्यांग प्रमाणपत्र अयोग्य आहे. त्यांना दि. 29 जुलै 2021 रोजी 18 टक्केचे युडीआयडी दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आले होते. मात्र त्यांनी सदरचे प्रमाणपत्र सादर न करता बदली प्रक्रियेमध्ये लाभ मिळवण्याच्या हेतूने उपजिल्हा रुग्णालय कराड यांच्याकडील 48 टक्केचे अयोग्य दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून प्रशासनाची दिशाभूल केली आहे. त्यामुळे त्यांना सेवेतून निलंबीत करुन निलंबन कालावधीमध्ये त्यांचे मुख्यालय पंचायत समिती पाटण हे राहील. तसेच त्यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिले आहेत.
जि.प. शाळा काळेवाडी ता. माण येथील उपशिक्षक श्रीकांत विष्णू दोरगे यांनी बदलीसाठी मुलगा सोहम याला जिल्हा रूग्णालय सातारा यांनी 42 टक्केचे युडीआयडी दिव्यांग प्रमाणपत्र दिले होते. शासन निर्णयानुसार त्याची फेरतपासणी केली असता त्यामध्ये कर्णबधीर या दिव्यांगात्वाचे मूल्यमापन 0 टक्के आढळून आले आहे. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सकाच्या अहवालानुसार श्रीकांत दोरगे यांनी प्रशासनाची दिशाभूल केली असून त्यास ते वैयक्तिकरित्या जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना सेवेतून निलंबीत करून निलंबन कालावधीमध्ये त्यांचे मुख्यालय पंचायत समिती खटाव हे राहील. तसेच या आदेशाची नोंद मूळ सेवापुस्तकात घेण्यात यावी, असेही काढण्यात आलेल्या आदेशात मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी म्हटले आहे. दरम्यान, आतापर्यंत 3 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई जिल्हा परिषद प्रशासनाने केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.