Satara lightning strike: वीज कोसळून दोन शेतकरी जागीच ठार

माण व कोरेगाव तालुक्यात वळवाचे थैमान : घरांचे पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडली
Satara lightning strike: वीज कोसळून दोन शेतकरी जागीच ठार
Published on
Updated on

दहिवडी/कोरेगाव : जिल्ह्यात शनिवारी वळवाने अनेक ठिकाणी थैमान घातले. माण तालुक्यातील वाघमोडेवाडी व कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडी येथे वीज कोसळून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर चौघेजण भाजले आहेत. दरम्यान, माणमधील दहिवडी, गोंदवले, पिंगळी, पळशी, म्हसवडसह अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्याने कहर केला. घरांचे पत्रे उडणे, झाडे उन्मळून पडणे तसेच शेतीपिकांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या.

माण तालुक्याला शनिवारी वळवाचा तडाखा बसला. वाघमोडेवाडी येथे आनंदराव कोकरे यांच्या शिखर खडी शेतातील बोअरवेलमधील मोटर काढण्यासाठी शंकर रामचंद्र वाघमोडे (वय 42, रा. पिंगळी बुद्रुक) हे अन्य चौघांसह गेले होते. दरम्यान, अचानक जोरदार वादळी वारे व पावसाला सुरुवात झाल्याने सर्वजण ट्रॅक्टरच्या आडोशाला थांबले होते. त्याचवेळी अचानक विजेचा जोरदार कडकडाट होऊन विजेचा गोळा शंकर वाघमोडे यांच्या अंगावर कोसळला. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत अन्य चौघेही भाजले गेले असून दहिवडी ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कोरेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील किल्ले वर्धनगडाच्या पायथ्याशी असलेल्या रामोशीवाडी गावाच्या हद्दीत शनिवारी दुपारी वीज अंगावर कोसळल्याने शेतकरी दादा चिलबा बुधावले (वय 52) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घोडमुख शिवारात शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दादा बुधावले हे बकरी चारण्यासाठी गेले होते. अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. बकरी काही अंतरावर सोडून पावसापासून बचाव करण्यासाठी बुधावले बाजूला थांबले असता अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, माण तालुक्यातील दहिवडी परिसरातही पावसाने तांडव केले. दहिवडी येथील मोरे मळ्यात ज्योतीराम मधुकर मोरे व आनंदराव मधुकर मोरे यांच्या घरांवरील पत्रे उडून गेल्याने घरातील साहित्य भिजले. दहिवडी व गोंदवले परिसरातील अनेक झाडे उन्मळून पडली.

वळीवाच्या पावसाने माण तालुक्यातील म्हसवड, गोंदवले, पळशी, पिंगळीसह अनेक गावांत कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. वाघमोडेवाडी येथील दिनकर बयाजी वाघमोडे यांच्या शेतातील केळी व शेवग्याच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पिंगळी बुद्रुक परिसरात मक्याच्या पिकांचे नुकसान झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news