Satara Investment Fraud : सातार्‍यातील दोन कंपन्‍या ईडीच्‍या रडारवर

गुंतवणुकीवर परताव्‍याच्‍या आमिषाने फसवणूक : ट्विंकल व सिट्रस ग्रुपमध्‍ये खळबळ
Investment Fraud
Investment FraudPudhari
Published on: 
Updated on: 

सातारा : आकर्षक हॉलिडे योजना आणि गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून हजारो कोटी रुपये गोळा केल्याच्या कथित आर्थिक फसवणूक प्रकरणाचे सातारा कनेक्‍शन समोर येत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ही मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली असून संबंधित कंपनीच्या सातार्‍यातील प्रॉपर्टीही रडारवर आल्‍या आहेत.

रॉयल ट्विंकल स्टार क्लब लिमिटेड आणि सिट्रस चेक इन्स लिमिटेड अशा त्‍या कंपन्‍या आहेत. या कंपन्यांशी संबंधित मुंबई, पुणे आणि साताऱ्यातील एकूण ५५६.७२ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता तात्पुरत्या जप्त करण्यात आल्या आहेत. या कंपन्यांनी २००८ ते २०१७ या काळात हॉलिडे मेंबरशिप व गुंतवणूक योजनांद्वारे तब्बल ८,८५२ कोटी रुपये गोळा केल्याचा ईडीचा दावा आहे. पर्यटन सुविधा, गुंतवणुकीची रक्कम परत मिळण्याचे आश्वासन आणि अतिरिक्त आर्थिक लाभाचे आमिष दाखवून या योजना राबवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

मात्र, आवश्यक सेबी नोंदणीशिवाय या योजना चालवल्याचा ईडीचा आरोप आहे. ईडीच्या तपासानुसार, जमा झालेल्या रकमेतून सुमारे ३,४३० कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत करण्यात आले, तर एजंटांना ३,०७७ कोटी रुपये कमिशन देण्यात आले. तसेच १,७२३ कोटी रुपये संबंधित संस्थांकडे कर्ज व आगाऊ रकमेच्या स्वरूपात हस्तांतरित करण्यात आले. नव्या गुंतवणूकदारांच्या पैशातून जुन्या गुंतवणूकदारांना परतावा दिल्याने या योजनेचे स्वरूप पाँझी प्रकारचे असल्याचा ईडीचा संशय आहे. या प्रकरणात ८७ हून अधिक संबंधित कंपन्या व संस्थांचे जाळे उघड झाले आहे. या माध्यमातून गुंतवणुकीची रक्कम विविध व्यवसाय आणि स्थावर मालमत्तांमध्ये वळवण्यात आल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे.

साताऱ्यातील मालमत्ता कोणत्‍या...

या कारवाईत साताऱ्यातील मालमत्तांचाही समावेश असल्‍याचे समोर आले आहे. मात्र त्या नेमक्या कोणत्या ठिकाणी आहेत? त्यांचे क्षेत्रफळ आणि मालकी कोणाची आहे? याची माहिती समोर आलेली नाही. ट्विंकल व सिट्रस ग्रुपमध्‍ये अनेक शिक्षक व पदाधिकारी कार्यरत होते. त्‍यामुळे दिवसभर हा ग्रुप अस्‍वस्‍थ होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.