

पाटण : पर्यावरणाचा रक्षणकर्ता म्हणून जागतिक पटलावर ओळख असलेल्या पाटण तालुक्यात सध्या पर्यावरणाचा ऱ्हास करून स्थानिकांचे बळी घेण्याचे दुर्दैवी प्रकार घडत असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहेत.
कोकण व प्रामुख्याने चिपळूण, महाड, लोटा एमआयडीसी व त्याठिकाणच्या कारखान्यातील घातक रसायनांचे शेकडो टँकर पाटण तालुक्यात कोयनेसह अन्य नद्या, नाले, ओढ्यांमध्ये ओतण्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा करणाऱ्या कोयनेसह अन्य नद्यांना आणि नदीकाठावरील गावांना या रासायनिक घातक रसायनांचा धोका निर्माण झाला आहे.
घातक रसायने मिश्रीत पाण्यामुळे स्थानिकांचे जीवन पूर्णपणे धोक्यात आले असून कोयना ते कराड व पुढे सांगलीपर्यंत कोयना नदीच्या पाण्याचा प्रवास चालतो. त्यामुळे या पाण्यावर अवलंबून स्थानिक जनता व शेती पूर्णपणे धोक्यात आल्याने याबाबत आता स्थानिक नेत्यांची चुप्पी जनसामान्यांच्या मुळावर उठत आहे.
मागील काही दिवसांपासून कोकणातील चिपळूण, लोटे, महाड इथल्या स्थानिक एमआयडीसी व अन्य कंपन्यातील घातक रसायनांची विल्हेवाट लावण्याचे टेंडर पाटण तालुक्यातील काही राजकीय कार्यकर्त्यांनी घेतल्याची चर्चा आहे. यातून लाखो रुपयांची लालसा व राजकीय वरदहस्त लाभल्याने या मंडळींनी अशा पद्धतीची घातक रसायने कोकणातून पाटण तालुक्यात आणायची व स्थानिक कोयनेसह अन्य नद्या, ओढे ,नाले यात ओतण्याचे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. प्रामुख्याने रात्रीच्यावेळी कोकणातून असे घातक रसायनांचे टँकर पाटणच्या दिशेने येतात व मध्यरात्री दोन ते पहाटेच्या दरम्यान हे टँकर कोयना नदीसह अन्य नद्यांमध्ये मोकळे केले जातात.
यातून संबंधितांचा वाहतूक खर्च कमी येतो शिवाय घातक रसानांची विल्हेवाट लावल्याने यातून मोठ्या प्रमाणावर मलिदाही संबंधितांना मिळत असल्याने याबाबत कोणतीही वाच्छता करत नसल्याचे बोलले जाते. प्रामुख्याने अतिवृष्टी, पूर व मोठ्या प्रमाणावर नद्या, नाले, ओढ्यांमध्ये पाणी याचा गैरफायदा ही मंडळी घेत असल्याच्या तक्रारीही आहेत. असे अनेक घातक रसायनांचे टँकर पाण्यात मिसळण्यात आल्याची खात्रीशीर माहिती आहे. तर शेकडो टँकरचे टेंडर संबंधितांना मिळाल्याने महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ, स्थानिक पोलीस यंत्रणा यांच्याशीही संबंधितांचे लागेबांधे असल्याने यातूनही लाखोंची हप्तेखोरी झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान घातक रसायनांचे टँकर कोयना नदीत सोडताना स्थानिकांनी संबंधितांना त्यांच्या वाहनांसह रंगेहाथ पकडूनही याबाबत कोणत्याही कारवाया झाल्या नाहीत. यावरूनच या रॅकेटचे धागेदोरे दूरपर्यंत पसरल्याच्याही चर्चा आहेत. सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या व शेती पिकेही उद्ध्वस्त करणाऱ्या या प्रकाराबाबत वरिष्ठांनी तातडीने लक्ष घालून संबंधितांवरकारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. काही दिवसांपासून हे प्रकार सुरू असल्याचे बोलले जाते.