Satara News | पर्यटन करा; पण जीवाला जपा

जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन : पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचना
Satara News |
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पर्यटनाच्यादृष्टीने अधिकार्‍यांसोबत चर्चा केली.File Photo
Published on
Updated on

सातारा : जिल्हा निसर्ग सौंदर्याने संपन्न असल्याने पर्यटनासाठी येणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा पर्यटकांना आनंद घेता यावा यासाठी त्याठिकाणी कोणत्याही स्वरूपाची बंदी नाही, तथापि सुरक्षिततेच्याद़ृष्टीने प्रशासनाकडून आचारसंहिता घालून देण्यात आली आहे. पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेत असतानाच दुर्घटना होणार नाही; पर्यटन जीवावर बेतणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

सातारा जिल्ह्यात प्रत्येक ऋतूत पर्यटकांना साद घालणारा जिल्हा आहे. अजिंक्यतारा किल्ला, ठोसेघर धबधबा, केळवली-सांडवली धबधबा, भांबवली-वजराई धबधबा, कास पुष्प पठार, एकीव धबधबा, कास तलाव, बामणोली, पंचकुंड धबधबा, सडावाघापूर उलटा धबधबा, लिंगमळा धबधबा तसेच महाबळेश्वर व पाचगणी पर्यटनस्थळ व धरणे अशा पर्यटनस्थळांच्या परिसरात राज्यासह परराज्यातून येणार्‍या पर्यटकांची मोठी संख्या असते. त्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासन दक्षता घेत आहे. पर्यटकांनी त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे. पावसाळ्यातील पर्यटनासाठी येणार्‍या नागरिकांच्या सुरक्षिततेच्याद़ृष्टीने व कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मार्गदर्शक सूचना करताना प्रशासनाने काही बाबींवर निर्बंध घातले आहेत.

सार्वजनिक ठिकाणी खाद्य पदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे, सार्वजनिक ठिकाणी येणार्‍या महिला व मुलींची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य अश्लिल हावभाव करणे किंवा लज्जा निर्माण होईल, असे कोणतेही वर्तन करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम लावणे किंवा डीजे सिस्टीम वाजवणे, वाहनातील स्पिकर किंवा उफर मोठ्या आवाजात वाजवणे व ध्वनी प्रदूषण करणे, याला प्रतिबंध करण्यात आले आहे.

वायू व जलप्रदूषण होईल अशी कोणतीही कृती करणे तसेच धबधबे, धरणे नदी आदी परिसरात सर्व दुचाकी, चारचाकी व सहाचाकी वाहनास प्रवेशास मनाई (अत्यावश्यक सेवेतील वाहन वगळून) करण्यात आली आहे. ही मार्गदर्शक आचारसंहिता ही पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी असून पर्यटनाचा आनंद घेत असताना कोणतीही दुखापत, इजा होणार नाही याची किंवा पर्यटन जीवावर बेतणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे. पर्यटनासंबंधीचे निर्बंध हे 19 ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय नागरिक सुरक्षा संहितानुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news