

सातारा : कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केले. विभागीय यंत्र अभियंता विकास माने, विभागीय सुरक्षा अधिकारी शेखर फरांदे आणि विभागीय भांडार अधिकारी सचिन गायकवाड अशी निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. या कारवाईमुळे एसटी विभागात खळबळ उडाली आहे.
महामंडळाचे माहिती व तंत्रज्ञान महाव्यवस्थापक विरेंद्र कदम यांनी 8 आणि 9 मे रोजी शिरवळ तसेच पाटण आगारास भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील परिस्थितीची माहिती घेतली. त्यांना काही आक्षेपार्ह गोष्टी आढळून आल्या. यासंबंधित अहवाल त्यांनी कार्यकारी व्यवस्थापकांना पाठवला. त्यानुसार ही कारवाई केली. दोन्ही आगारातून अवैध प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे कदम यांना आढळले.
याप्रकरणी विभागीय सुरक्षा अधिकारी फरांदे यांना निलंबित केले. तर विभागीय यंत्र अभियंता माने आणि भांडार अधिकारी गायकवाड यांना या भेटीच्या वेळी अनुपस्थित राहिल्याने कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले आहे.