Satara Crime : तिघांवर हल्ला करून चोरट्यांनी दुकान फोडले
खटाव : खटाव येथील मुश्ताक शिकलगार यांच्यासह त्यांच्या पत्नी समिना आणि मुलगी अलिशा शिकलगार यांच्यावर हल्ला करत अज्ञात चोरट्यांनी किराणा मालाचे दुकान फोडून 16 हजारांची रोकड लंपास केली. ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे गावात चोरीच्या घटनेची माहिती मध्यरात्रीच देण्यात आली. पोलिसांचे पथकही त्वरित घटनास्थळी हजर झाले; मात्र आंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार झाले. ग्रामपंचायतीची गावातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याने पोलिसांसमोर चोरट्यांनी तपासाचे आव्हान उभे केले आहे.
पुसेगाव पोलिस ठाण्यात मुश्ताक शिकलगार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि. 14 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता किराणा मालाचे दुकान बंद करुन मुश्ताक शिकलगार आणि कुटुंबिय झोपी गेले. मध्यरात्री 12.30 वाजता शिकलगार यांना कसलातरी आवाज आला म्हणून त्यांनी दुकानात जावून पाहिले असता दोन व्यक्ती काऊंटरजवळ उभे असलेले दिसले. लाईट लावत असतानाच एकाने शिकलगार यांना ढकलले आणि दुसऱ्याने ड्रॉव्हरमधील पैसे घेतले. चोरट्यांशी शिकलगार यांची झटापट सुरु असताना एक व्यक्ती दुकानाबाहेर उभा होता. चोरट्यांनी शिकलगार यांच्या हातावर मारहाण केली. त्यांनी आरडाओरडा करताच समिना शिकलगारही तेथे आल्या. शिकलगार पती, पत्नी यांनी चोरट्यांचा पाठलाग करताच ते आंबेडकर चौकाच्या दिशेने पळाले. चोरट्यांनी दुकानातून 16 हजारांची रोकड लांबवली असल्याचे तसेच 18 ते 22 वयोगटातील व्यक्तींनी त्यानंतर गावातीलच शंकर पाटोळे यांच्या घरीही चोरी केल्याचे शिकगार यांनी तक्रारीत नमूद केले आहे. चोरीची घटना घडल्यानंतर रात्री साडेतीन वाजता ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे पोलिस पाटील भोसले यांनी गावातील लोकांना सूचीत करुन सावध राहण्याचे आवाहन केले. गस्तीवर असणारे पोलिसांचे पथकही लगेच घटनास्थळी हजर झाले, मात्र आंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार झाले. दुसऱ्या दिवशी श्वानपथक पाचारण करुन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. ग्रामपंचायतीची सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याचा फायदा चोरट्यांनी घेतल्याची चर्चा गावात सुरु होती. घटनेचा अधिक तपास सुधाकर भोसले करत आहेत.

