

सातारा : एका महिला वकिलाने दुचाकीच्या डिकीत ठेवलेली तीन लाखांची रोकड चोरट्यांनी दिवसाढवळ्या लंपास केली. महिलेने सातारा येथील पोस्ट ऑफिसमधून पैसे काढून दुचाकीच्या डिकीत ठेवल्यानंतर, चोरट्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि अवघ्या 40 मिनिटांत तब्बल 3 लाख रुपयांची रोकड लंपास केली. चोरट्यांनी पोस्टातूनच महिलेवर पाळत ठेवल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
याप्रकरणी अॅड. वैशाली मंगेश जाधव (वय 43, रा. रामनगर, सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅड. वैशाली जाधव यांनी गुरुवारी दुपारी पोवई नाक्यावरील मुख्य पोस्ट ऑफिसमधून 3 लाख रुपयांची रक्कम काढली. ही रक्कम त्यांनी आपल्या एमएच 11 बीयू 5301 या दुचाकीच्या डिकीत सुरक्षित ठेवली. त्यानंतर त्या सदर बझारमधील रिमांड होममध्ये एका कामासाठी गेल्या. रिमांड होममधील त्यांचे काम सुमारे 40 मिनिटे चालले. काम आटोपून बाहेर आल्यानंतर त्यांच्या दुचाकीच्या डिकीची मोडतोड झाल्याचे दिसले. तसेच आतील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे, डिकीत ठेवलेली 3 लाखांची रोकड, बँकेचे पासबुक, चेकबुक आणि काही महत्त्वाची कायदेशीर कागदपत्रे चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती सातारा शहर पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात, चोरट्यांनी पोस्ट ऑफिसमधूनच अॅड. जाधव यांच्यावर नजर ठेवली होती, हे स्पष्ट झाले आहे. मोठ्या रकमा काढणार्या नागरिकांना लक्ष्य करणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याआधारे चोरट्यांचा माग काढण्याचे काम सुरू आहे.
पोस्ट ऑफिसमध्ये पैसे काढणार्यांना चलन भरून द्यायला सांगितले गेले. त्यानुसार रकमा काढणार्यांनी चलन भरून दिले. संबंधितांना पैसे दिले जात असताना नाव व त्यापुढील रक्कम मोठ्या आवाजात पुकारून दिली जात होती. चोरट्यांनी हीच संधी साधत मोठी रक्कम असणार्या महिलेला हेरल्याचे समोर येत आहे.