

सातारा : सातारा शहरातील शाहूपुरी व गोडोली येथे चोरट्यांनी उच्छाद घालत घरफोड्यांचे सत्र राबवले. साडेसहा तोळे वजनाच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शाहूपुरी येथील घरफोडीप्रकरणी स्वप्निल दिलीप कुलकर्णी (वय 38, रा. सिद्धीविनायक सोसायटी, शाहूपुरी) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. चोरीची घटना दि. 27 ऑक्टोबर रोजी घडली आहे. अज्ञातांनी घराच्या पहिल्या मजल्यावरील कपाटातील सोन्या, चांदीचा ऐवज, रोख 7740 रुपये तसेच ठेव पावत्या, कागदपत्रे असा 1 लाख 75 हजार रुपये किमतीचा हा ऐवज चोरी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
गोडोली येथील चोरी प्रकरणी तक्रार विक्रम बाळू यादव (वय 38, रा. गोडोली, सातारा) यांनी दिली आहे. चोरट्यांनी दि. 28 ऑक्टोबर रोजी त्यांची मोबाईल शॉपी व भावाचे किराणा दुकान फोडले आहे. त्यातून चोरट्यांनी मोबाईलसह किराणा दुकानातील साहित्य असे एकूण 31 हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे.