

सातारा : महाबळेश्वर (जि. सातारा) येथील हॉटेलमधील साहित्य चोरी करून ते भंगारात विकून दुबईला पळून जाण्याचा प्रयत्न कामगाराने केला. मात्र, सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) पोलिसांनी चोरट्याचा डाव हाणून पाडत विमानतळावर त्याला अटक केली. पोलिसांनी या कारवाईत 17 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कांचन कालीप्रसाद बॅनर्जी (वय 54, रा. नालासोपारा, मुंबई) असे मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. यासोबत भंगार व्यावसायिक करण दशरथ घाडगे (वय 25, रा. आंबवडे खु. ता. सातारा) व गौतम सुरेश जाधव (वय 25, रा. सैदापूर ता.सातारा) यांनाही अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, महाबळेश्वर येथील हॉटेल ऑक्सिजनमधून इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू, फर्निचर, भांडी असे 9 लाख रुपयांचे साहित्य चोरीला गेले होते. 25 जून रोजी चोरीची घटना घडल्यानंतर याप्रकरणी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सातारा एलसीबीचे पोलिसांनी देखील घटनास्थळी भेट देवून तपासाला सुरुवात केली. तांत्रिक तपासात पोलिसांना ही चोरी हॉटेलमध्ये काम करणार्या एका कामगाराने केल्याचे लक्षात आले.
सातारा पोलिस हॉटेल कामगाराची माहिती घेत असतानाच तो दुबई येथे पळून जाणार असल्याची माहिती मिळाली. सातारा पोलिसांनी तेथील सहार पोलिस ठाणे मुंबई यांच्या मदतीने संशयित कांचनला विमानतळावर पकडले. त्याने महाबळेश्वर हॉटेलमधील गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, वाई डीवाएसपी बाळासाहेब भालचीम, पोनि अरुण देवकर, पोनि बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रोहित फार्णे, फौजदार विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, रुपाली काळे, रौफ इनामदार, पोलिस विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमित माने, अविनाश चव्हाण, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, अमोल माने, अजित कर्णे, राकेश खांडके, सनी आवटे, हसन तडवी, सचिन ससाणे, रविराज वर्णेकर, रोहित निकम, विशाल पवार, स्वप्नील दौंड, पंकज बेसके यांनी कारवाईत सहभाग घेतला.