

पळशी : कोरेगाव तालुक्यातील चंचळी गावात शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत अनेक ठिकाणी चोरी केली. घर, पोस्ट ऑफिस, टपरी आणि दुकान फोडून चोरट्यांनी मौल्यवान ऐवज लंपास केला. चोरी करतानाचे काही प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून दुकान फोडल्यानंतर चोरटे चिक्की व कुरकुरे खात बसल्याचे दृश्यही समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या रात्रगस्तीवर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
चंचळी येथील नारायण जाधव हे मध्यरात्री स्वच्छतागृहासाठी उठले असता चोरट्याने घरात घुसखोरी केली. यावेळी त्यांच्या बहीण सावित्रा कदम यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचा सोन्याचा हार चोरट्याने हिसकावून घेतला. सावित्रा कदम यांनी आरडाओरड केल्यावर 87 वर्षीय त्यांचे बंधू नारायण जाधव यांनी चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्याने त्यांच्या छातीत जोरदार बुक्की मारून त्यांना खाली पाडले आणि तेथून पळ काढला. दरम्यान, याच रात्री गावातील ग्रामपंचायतसमोरील पोस्ट ऑफिसची तिजोरी फोडण्याचाही प्रयत्न केला. तर अनिल शिंदे यांच्या घरातील पेटी चोरट्यांनी पळवून नेली. संपत कुंभार यांचीही टपरी फोडली. एकाच रात्री पाच ते सहा ठिकाणी चोरीचे प्रकार घडल्याने गावात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच सपोनि हेमंतकुमार काटकर, उपनिरीक्षक अतुल जगदाळे व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रकार घडूनही अद्याप कोणत्याही नागरिकाने अधिकृत तक्रार दाखल केलेली नसल्याचे समोर आले आहे.