सातारा : झेडपीच्या शिक्षण विभागाची चमकोगिरी

सातारा : झेडपीच्या शिक्षण विभागाची चमकोगिरी
Published on
Updated on

सातारा पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या स्वच्छ, सुंदर, उपक्रमशील शाळा स्पर्धा व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमाचा शनिवारी पुरता बोर्‍या उडाला. नियोजनाचा अभाव, कार्यक्रमातील विस्कळीतपणा, गुणवंत विद्यार्थ्यांचा विसर, सावळा गोंधळ यामुळे संपूर्ण कार्यक्रमाचा खासदारांसमोरच पचका झाला. त्यामुळे उपस्थित पालक, विद्यार्थी व शिक्षणप्रेमींनी संताप व्यक्त केला.

सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने स्व. यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात स्वच्छ, सुंदर, उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण शाळा स्पर्धा, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे शनिवारी आयोजन केले होते. या कार्यक्रमास खा. श्रीनिवास पाटील, जि.प. उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, समाजकल्याण समिती सभापती कल्पना खाडे, कृषी समितीचे माजी सभापती मनोज पवार यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यात राज्य शिष्यवृत्तीधारक

विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी केवळ जिल्हा परिषदेच्या शाळांच्याच विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. त्यामुळे झेडपीच्या शिक्षण विभागाला खासगी शाळांचा विसर पडला की काय ? असा प्रश्न उपस्थित झाला. शिक्षण विभागाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे याची अनेकांना माहितीच नव्हती.

या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांना कार्यक्रमापूर्वी किमान दोन दिवस कल्पना देणे गरजेचे होते. पण शनिवारी झालेल्या कार्यक्रमात तसे काही झालेच नसल्याचे प्रकर्षाने जाणवले. अनेक विद्यार्थ्यांनी सातारा जिल्ह्याचा राज्यभर नावलौकीक केला. मात्र, प्रशासन म्हणून या विद्यार्थ्यांचे कौतुक शिक्षण विभागाने केले नाही.

खाजगी शाळांकडे याबाबत विचारणा केली असता शिक्षण विभागाकडून कोणतेही पत्र आले नसल्याचे या शाळांनी सांगितले. प्रत्यक्षात मात्र कार्यक्रमात प्रथम, द्वितीय, तृतीय विद्यार्थ्यांची नावे पुकारली गेली. त्यामुळे शिक्षणाधिकारी म्हणवून घेणार्‍यांची अक्कल ठिकाणावर होती का? असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.

कोरोनाचा कठीण काळ असतानाही विद्यार्थ्यांनी स्वत:च्या हिंमतीवर कष्ट करुन गुणवत्ता संपादित केली. शाळेचे व जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. काही ठिकाणी तर शाळांनीही गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार केले नाहीत आणि दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानेही त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे संस्थाचालक जसे चमकोगिरी करतात तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारीही करतात, असाच सूर ऐकायला मिळाला. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला.

नव्याने पदभार घेतलेल्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर व उपशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांच्यातील समन्वयाचा अभाव व ढिसाळ नियोजनाचा फटका अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना बसला. त्यामुळे शिक्षण विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी फक्त चमकोगिरी केली असल्याचेच चित्र कार्यक्रमादरम्यान पहावयायस मिळाले. ज्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तो उद्देशच फोल ठरला आहे.

कार्यक्रमाचे नेटके नियोजन असल्यास सर्व काही सुरळीत चालते. परंतु, येथे नियोजनाचाच फज्जा उडाल्याने कार्यक्रमाचाच तमाशा झाला. जे विद्यार्थी व शिक्षक कार्यक्रमासाठी आले होते त्यांच्यात शिस्त नव्हती. अनेक शिक्षक हे गप्पांचे फड रंगवत होते. काही जणांनी फोटोसेशन करण्याचा धडाका लावला होता. या

फोटोसेशनमुळे पदाधिकारी व अधिकारी यांना मात्र घाम फुटला होता.

तर मुख्य कार्यक्रमादरम्यान विद्यार्थीही इथून तिथे करत होते. काही जणांनी कार्यक्रमच अर्धवट सोडला. ज्याचा सत्कार तो लागलीच परतीची वाट धरत होता. त्यामुळे गोंधळात आणखी भर पडत गेली. नियोजनाअभावी कार्यक्रमात बेशिस्तीचा कळस गाठल्याचे चित्र दिसून आले.

काही कर्मचारी तर हाताची घडी घालून या गोंधळाची मजा घेत होते. त्यामुळे सभागृहात नेमका कोणता कार्यक्रम सुरू आहे, हे कोणालाच कळत नव्हते. एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे नियोजन ज्यांनी केले त्यांची दमछाक झाली. अनेक जणांचे नाव पुकारल्यानंतर संबंधित शिक्षक किंवा विद्यार्थी हे जागेवर नव्हते.

त्यामुळे त्यांची शोधाशोध अधिकार्‍यांना करावी लागली. विद्यार्थ्यांच्या कौतुकसोहळ्यासाठी लाखो रूपयांचा खर्च झाला. मात्र, ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम घेतला गेला त्यातील अनेकांना बोलावणेच धाडले नाही. तर जे आले त्यांनी आपले रंग दाखवले. त्यामुळे हा कौतुक सोहळा न होता तो शिक्षण विभागतील अधिकारी व कर्मचार्‍यांचा दिखावा होता. त्यामुळे झालेल्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

सन्मान सोहळ्यात शिक्षण विभागाचा तमाशा

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सातारा जिल्ह्याला आहे. हा वारसा जिल्हा परिषदेत येणार्‍या अधिकारी व पदाधिकार्‍यांनी जपला आहे. आपल्या कामाची छाप उमटवत राज्य व देशभरात सातारा झेडपीचा डंका वाजलेला आहे. अशा आदर्श असणार्‍या सातारा जिल्हा परिषदेत एखाद्या कार्यक्रमाचा फज्जा उडण्याची ही पहिलीच वेळ असावी.

स्वच्छ, सुंदर शाळा उपक्रमात अधिकार्‍यांमध्येच राजकारण झाल्याचे कार्यक्रमात पाहायला मिळाले. याचा फटका मात्र खासगी विद्यालयातील विद्यार्थ्यांना बसला. या राजकारणामुळेच या पारितोषिक वितरण सोहळ्याचा तमाशा झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news