Satara Crime: टेरर गँग फाळकूट; रात्री दहशत, पहाटे लूट

हायवेवर रोजच लूटमारी; कॉलेजकुमारांची रिंगण करून हाणामारी
Satara Crime
Satara CrimePudhari Photo
Published on
Updated on
विठ्ठल हेंद्रे

सातारा : साताऱ्यातील एसटी स्टॅन्ड, सेव्हन स्टार बिल्डिंग परिसरात कॉलेजकुमार तसेच धतिंगगिरी करणारे टगे एकमेकांना अक्षरश: रिंगण करून हाणामारी करत आहेत. याशिवाय फाळकूट गँगकडून महामार्गावरील बहुतांश ठिकाणी रात्री, पहाटेचा प्रवासी उतरला की, लूटमारी करायचा फंडा कायमचाच बनला आहे. रात्रीची भीती अन्‌‍ पहाटेची लूट हे आता नित्याचेच बनले आहे, तरीही पोलिस का ठोस कारवाई करत नाहीत, असा सवाल उपस्थित झाला आहे.

साताऱ्यातील क्राईम रेट काही केल्या कमी होत नाही. सदैव 24 तास वर्दळीचा परिसर म्हणजे सातारा मध्यवर्ती बसस्थानक; मात्र गेल्या काही वर्षांपासून हा परिसर हाणामारी, लूटमारीसाठी कुप्रसिद्ध झाला आहे. सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत कॉलेजकुमारांची एसटी बसमधून ये-जा सुरू असते. कॉलेजमध्ये एकमेकांना बघण्याच्या क्षुल्लक कारणातून टोळकी एकत्र येतात. एकतर कॉलेजच्या बाहेर कुटले जाते. तिथं नाही जमले तर एसटी स्टॅन्ड हाणामारीसाठी पोरांसाठी जणू सेफ झोन झाला आहे. ज्याला हाणायचा आहे त्याच्यावर वॉच ठेवून टोळकं एक-दोघांना सेव्हन स्टार बिल्डिंगच्या परिसरातील खोपचाटात घेऊन जातात.

याठिकाणी गोल रिंगण करुन लाथा-बुक्क्यांनी हाणले जाते. रिंगण करुन हाणामारी करणाऱ्या टोळक्यांची प्रचंड दहशत आहे. हाणामारी करणाऱ्या टग्यांमध्ये साताऱ्यातील ह्या पेठेतील, त्या पेठेतील असतो. त्यातील एखाद्याने गांजा मारलेली असते. दोघे-चौघेजण मावा, गुटखा खावून तोबरा भरुन असतात. टार्गेट दिसला की ही चार-पाच टाळकी आव्वाज टाकून दहशत निर्माण करतात. लगेच बाजूला घेवून मग थेट गोल रिंगण करुन लाथा-बुक्क्यांनी हाणामारी करतात. बीड जिल्ह्यातील रिंगण पद्धतीच्या मारहाणीचा पॅटर्न सातारा एसटी स्टॅन्डमध्ये दुर्देवाने कुप्रसिध्द झाला आहे. याशिवाय एसटी स्टॅन्ड परिसरात मध्यरात्री देखील गर्दुले मोकाट फिरत असतात. स्टॅन्ड परिसरात असंख्य वेगवेगळ्या प्रकारची दुकाने आहेत. अनेकदा कुलुप तोडून शटर ओढत चोऱ्या केल्या जात आहेत. एकाचवेळी 4-5 दुकाने फोडून पैसे, वस्तू चोरल्या जात आहेत. यामुळे हा संपूर्ण परिसर अशांत बनत चालला आहे.

साताऱ्यातील एसटी स्टॅन्डची अशी तऱ्हा असताना दुसरीकडे शहरालगत महामार्गावर लुटमारीची दहशत आहे. रात्री 11 नंतर किंवा पहाटे प्रवासी आला की तो लुटला गेला असे समीकरण बनले आहे. प्रामुख्याने बॉम्बे रेस्टॉरंट परिसर, शिवराज पेट्रोलपंप परिसर, वाढे फाटा येथे अजिबात सुरक्षितता नाही. फाळकुट गँगची टोळी प्रवाशांवर लक्ष ठेवून असतात. सातारकर याठिकाणी निर्भयपणे थांबू शकत नाही. तेथून एकटा जावू-येवू शकत नाही, हेच वास्तव आहे. कारण एकटा प्रवासी दिसला की, लिफ्ट देतो म्हणून दुचाकीवरुन दोघेजण येतात आणि मारहाण करत सोने, पैसे लुटून जातात. गेल्या अनेक वर्षांपासून फुटकळ टोळक्यांकडून उच्छाद मांडला गेला आहे.

चमकोगिरीवर करिअरचा उतारा

एसटी स्टॅन्ड, कॉलेज परिसरात हाणामारी झाली की, भांडणे लगतच्या चौकीत किंवा पोलिस ठाण्यापर्यंत हे प्रकरण जाते. पोलिसांकडे असा मॅटर गेला की, पोलिस दोन्ही पार्टींची परिस्थिती बघतात. चमकोगिरी करणाऱ्या पोरांना पोलिस फैलावर घेतात; मात्र करिअर खराब होईल, अशी भीती दाखवतात. यामुळे तक्रारी दाखल होत नाहीत. याशिवाय गंभीर प्रकरण मिटवले म्हणून खाकी हात ओले करून प्रकरण रफादफा करतात. बालगुन्हेगारी वाढत जाण्याचे ही अशी मूळ कारणं आहेत. याच ठिकाणी पोलिसांनी फटके देऊन कुटुंबीयांना बोलावून पोरांचे नेमके उद्योग सांगणे गरजेचे आहे. हाणामाऱ्या करून हलक्यात आणि पैकं देऊन प्रकरण मिटल्याने इथूनच आणखी डेअरिंग वाढत जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news