

सातारा : कोंडवे, ता. सातारा येथे भाडेकरु म्हणून राहणाऱ्या व्यक्तीने घरमालक व त्यांच्या नातेवाईकांचा विश्वास संपादन करुन तब्बल 4 लाख 27 हजार 300 रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 25 नोव्हेंबर 2025 ते दि. 13 मार्च 2026 या कालावधीत ही घटना घडली. संशयित सागर शर्मा ऊर्फ केदारनाथ सागर शर्मा (रा. सिकंदराबाद, हैदराबाद, तेलंगणा) हा फिर्यादी यांच्या फ्लॅटमध्ये भाडेकरु म्हणून राहत होता. त्याने फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांचा तसेच नातेवाईकांचा विश्वास संपादन केला. यानंतर विविध कारणे सांगून संशयिताने अनेकांकडून पैसे उकळले.
यामध्ये विजय कांबळे यांच्याकडून गाडी खरेदी, घरभाडे व रेल्वे तिकीट या कारणांसाठी 1 लाख 76 हजार 300 रुपये, अरुण साळुंखे यांच्याकडून 1 लाख 10 हजार रुपये, विवेक मिलिंद गंभरे यांच्याकडून 50 हजार रुपये, प्रविण सदाशिव कांबळे यांच्याकडून 10 हजार रुपये तसेच विहार गायकवाड यांच्याकडून 81 हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. एकूण 4 लाख 27 हजार 300 रुपये घेतल्यानंतर संशयित पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी विजय सदाशिव कांबळे (रा. वृंदावन पोलिस टाऊनशिप, सातारा, मूळ रा. आगलावेवाडी, ता. जावली) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित सागर शर्मा याच्याविरुद्ध सातारा तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलिस हवालदार घोरपडे तपास करत आहेत.