

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढू लागला आहे. शनिवारी थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणार्या महाबळेश्वरचे कमाल तापमान 31.8 तर सातार्याचे कमाल तापमान 36.7 अंशावर होते. जिल्ह्यातील जनजीवन होरपळून गेले आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. मे महिन्यातील उन्हाप्रमाणेच उन्हाची तिरीप लागत आहे. त्यामुळे नागरिक चांगलेच घामाघूम झाले आहेत. गेल्या 10 ते 12 दिवसापासून उन्हाच्या कडाक्याने नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यापासूनच सूर्यनारायण तापला आहे. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. पहाटेच्या सुमारास वातावरणात काहीसा गारवा जाणवत आहे. मात्र सकाळी 9 वाजल्यापासूनच उन्हाचा चटका बसण्यास सुरुवात झाली आहे. सूर्य आग ओकतोय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढली असली तरी एप्रिल व मे महिन्यात आणखी उष्मा वाढण्याची शक्यता आहे. वाढत्या उन्हामुळे शेतकरीही सकाळ व सायंकाळनंतर शेतातील कामे करताना दिसत आहे.
तीव्र उन्हामुळे वर्दळीच्या रस्त्यावर शुकशुकाट जाणवत आहे. रस्ते व बाजारपेठा दुपारच्या सुमारास निर्मनुष्य होत आहेत. सायंकाळनंतरच बाजारपेठेत गर्दी होताना दिसत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी पंखे, कुलर, वातानुकूलीत यंत्रणेचा वापर वाढू लागला आहे. सातारा शहरासह जिल्ह्यातील रसंवती गृह, आईसस्क्रीम पार्लर, ज्यूस सेंटर, शितपेयांच्या दुकांनावर गर्दी वाढली आहे. प्रचंड उकाड्यामुळे पंखे, वातानुकुलीत यंत्रांना मागणी वाढली आहे. शनिवारी थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणार्या महाबळेश्वरचे कमाल तापमान 31.8 तर किमान तापमान 16.6 तर सातारचे कमाल तापमान 36.7 तर किमान तापमान 18.4 अंशावर होते.