

तारळे : पालकमंत्री शंभूराज देसाई व जिल्हा परिषद सदस्या स्वप्ना पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे सातारा–जळव एसटी बस मुक्कामी सेवा सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आंबळे, ढोरोशी, मरळोशी, जळव व परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
तारळे, नागठाणे व सातारा येथे शिक्षण, वैद्यकीय उपचार तसेच नोकरी-व्यवसायासाठी दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिक प्रवास करतात. मात्र, या मार्गावर पर्यायी बससेवेची अपुरी व्यवस्था असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे सातारा–जळव ही मुक्कामी एसटी सेवा सुरू करण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती.
या मागणीची दखल घेत जिल्हा परिषद सदस्या स्वप्ना पाटील यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. लोकांची गरज लक्षात घेऊन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून सातारा–जळगी मुक्कामी बससेवा सुरू करण्यात आली आहे. ही बस सातारा–तारळे मार्गावर दिवसातून काही फेऱ्याही करणार आहे.
बससेवेचा लाभ शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, उपचारासाठी साताऱ्यात जाणारे रुग्ण, नोकरी-व्यवसायासाठी प्रवास करणारे नागरिक तसेच आंबळे, ढोरोशी, मुरळोशी, जळव व परिसरातील ग्रामस्थांना होणार आहे. नागरिकांनी मंत्री शंभूराज देसाई व जि.प.सदस्या स्वप्ना पाटील यांचे आभार मानले आहेत.