

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी महाबळेश्वर ते तापोळा मुख्य रस्त्यावर चिखली शेडनजीक राडारोडा वाहून आल्याने नवीन बांधलेला रस्ता खचला होता. या रस्त्याची पहिल्याच पावसात दैना झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. ही घटना झाल्यानंतर बांधकाम विभागाच्या वतीने हे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा याच परिसरात पडझड झाली आहे. त्यामुळे डोंगर ठिसूळ झाल्याने तापोळा रस्त्यावरील चिखली शेड ते झोळखिंड परिसर धोकादायक झाला आहे.
महाबळेश्वर - तापोळा रस्त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी मिळाला. यातून काही महिन्यांपूर्वी कारवी आळा ते तापोळा पर्यंतच्या डांबरी रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले होते. गेल्या काही दिवसांपासून बरसणार्या या पावसाने 18 जूनच्या मध्यरात्री चिखली शेड नजीक रस्त्यावर प्रचंड मोठा मलबा वाहून आल्याने रस्ता वाहून गेल्याने तब्बल दोनशे ते तीनशे फुटांची दरी तयार झाली. यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. पहिल्याच पावसात रस्त्याची झालेली दुर्दशा पाहून नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता.
या परिसरात वन विभागाच्या हद्दीत महारोळा गावाच्या खालील बाजूस नवीन पाणी प्रवाह निर्माण झाला. तसेच याच लांबीत मोठ्या प्रमाणावर मलबा रस्त्यावर आला. नवीन तयार झालेल्या पाणी प्रवाहामुळे हा डांबरी रस्ता पाण्याच्या लोंढ्यामुळे पूर्णपणे दरीच्या दिशेने खचला व वाहून गेला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने तीन जेसीबीच्या सहाय्याने मलबा हटवण्याचे काम करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून गॅबियन वॉल बांधण्यासाठीची कामे सुरू करण्यात आली. हे काम सुरू असतानाच पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे रस्त्याचा काही भाग कोसळला आहे. संततधार पावसामुळे वाघेरा ते वेंगळे या रस्त्यावर भराव टाकून रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र, पुन्हा भराव वाहून गेल्याने रस्ता जलमय झाला.
दरडींचा धोका असल्यामुळे ही कामे करणे जिकिरीचे झाले आहे. प्रचंड पावसामुळे अडथळे येत आहेत. सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर लँड स्लाईड होत असल्यामुळे कुठलाही अपघात होऊ नये. या हेतूने मांघर पारुट मार्गे झोळाची खिंड अशी वाहतूक वळवण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून चिखली शेड परिसरात दरडी कोसळून वाहतूक ठप्प होते. त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. चिखली शेड परिसरातील वाहून गेलेल्या रस्त्याची पाहणी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्यासह अधिकार्यांनी केली आहे. त्यानुसार बांधकामचे उपअभियंता अजय देशपांडे यांना सूचना देण्यात आल्या आहेत.