

लोणंद : फलटण तालुक्यातील तांबवे धरण परिसरात गौण खनिज चोरीविरोधात महसूल विभागाने कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान शासकीय कामात अडथळा आणत शासकीय वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महसूल विभागाचे वाहनचालक बाळासाहेब पांडुरंग भिसे (वय ४४, रा. गिरवी नाका, फलटण) यांनी फिर्याद दिली आहे. नायब तहसीलदार तुषार गुंजवटे यांच्यासह महसूल विभागाचे भरारी पथक सोमवारी रात्री तांबवे धरण परिसरात गौण खनिज चोरीविरोधात कारवाईसाठी गेले होते. यावेळी तानाजी शेळके (रा. निंबोडी, ता. खंडाळा) याच्या सांगण्यावरून जेसीबीच्या सहाय्याने धरणातील माती टिपरमध्ये भरली जात असल्याचे पथकाला आढळून आले.
कारवाई सुरू असताना जेसीबी चालकाने जेसीबीची फरांडी शासकीय वाहनावर आदळून नुकसान केले. त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात जेसीबी पलटी झाला. दरम्यान, यामध्ये टिपरचा चालक घटनास्थळावरून वाहन घेऊन पसार झाला. याप्रकरणी तानाजी शेळके तसेच दोन चालकांविरुद्ध लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.