

सातारा/नागठाणे : सासपडर (ता. सातारा) येथील आर्या सागर चव्हाण (वय 13) या शाळकरी मुलीचा शुक्रवारी दुपारी राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. रात्री उशिरापर्यंत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन सुरू होते. शुक्रवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली.
याबाबत प्राथमिक माहिती अशी : आर्या गावातीलच शाळेत शिकत होती. घरी आई-वडील व लहान भाऊ असतो. आर्या शाळेतून आल्यानंतर घराला कुलूप होते. तिने परिसरात असलेल्या वडिलांकडून घराची किल्ली घेतली आणि आर्या घरी गेली. काही वेळाने तिचा भाऊ घरी गेल्यावर आर्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसते. त्याने तत्काळ वडिलांना याची माहिती दिली. वडिलांनी घरात जाऊन पाहणी केली असता आर्या निपचीत पडली होती. मुलीला रक्ताच्या थारोळ्यात पाहून वडीलांचे हातपाय गळाले. आरडाओरडा झाल्यानंतर ग्रामस्थ जमले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बोरगाव पोलिस घटनास्थळी आले. आर्याला प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले.
मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिचा मृतदेह सायंकाळी सिव्हीलमध्ये आणला होता. याठिकाणी एलसीबी, सातारा शहर व बोरगावचे पोलिस आले. नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
रात्री उशिरापर्यंत मृत्यूचे गूढ...
आर्याच्या मृत्यूने सासपडेत हळहळ व्यक्त होत आहे. तिच्या मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आर्याचा मृत्यू नेमका कशाने झाला? तिला कोणी मारले काय? नेमकी घटना कधी घडली? नेमके कारण काय, असे सवाल उपस्थित झाले आहेत. पोलीस प्रत्येकाकडे प्राथमिक चौकशी करून तपास करत होते.