Satara Gaur Death : जावलीत महाकाय रानगव्याच्‍या मृत्यूबाबत संशय

रानगवा शेतात मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ
Gaur
Gaur( File Photo)
Published on: 
Updated on: 

कुडाळ : जावली तालुक्यातील पद्मलेमुरा डोंगरमाथ्यावरील शेतशिवारात गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या महाकाय रानगव्याचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा रानगवा शेतात मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस करणाऱ्या या रानगव्याचा अचानक मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

पद्मलेमुरा डोंगरमाथ्यावरील शेतशिवारात या रानगव्याचा वावर गेल्या काही दिवसांपासून वाढला होता. शेतातील पिकांचे नुकसान करत हा रानगवा परिसरात फिरत असल्याने शेतकरी त्रस्त झाले होते. रात्रीच्या वेळी तसेच पहाटेच्या सुमारास शेतशिवारात त्याचा वावर असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास येत होते. त्यामुळे शेतीचे नुकसान होण्याबरोबरच शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनातही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, सोमवारी पहाटे शेतकरी नेहमीप्रमाणे शेतशिवारात गेले असता त्यांना हा महाकाय रानगवा एका ठिकाणी पडलेला दिसला. सुरुवातीला दूरून पाहताना तो झोपला आहे की काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. मात्र, त्याच्या हालचाली दिसत नसल्याने शेतकऱ्यांच्या मनात संशय निर्माण झाला. काही शेतकऱ्यांनी जवळ जाऊन पाहिले असता रानगवा मृतावस्थेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. महाकाय रानगव्याचा मृत्यू झाल्याची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी पाहण्यासाठी गर्दी केली. मृत रानगव्याचा नेमका मृत्यू कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे वनविभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी करावी, आवश्यक ती पशुवैद्यकीय तपासणी करून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करावे, अशी मागणी होत आहे.

तसेच परिसरातील वन्यप्राण्यांच्या वावरावर लक्ष ठेवून शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. रानगव्याच्या मृत्यूचे गूढ उकलणार का आणि वन्यप्राण्यांच्या उपद्रवातून जावलीतील शेतकऱ्यांची सुटका कधी होणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.