सुर्ली घाटात ट्रॅव्हल्स पलटी! चालकासह सात जण जखमी; ब्रेक फेल झाल्याने अपघात

सुर्ली घाटात ट्रॅव्हल्स पलटी! चालकासह सात जण जखमी; ब्रेक फेल झाल्याने अपघात
Published on
Updated on

कराड : कराड-विटा मार्गावर सुर्ली तालुका कराड गावच्या हद्दीत सुरली घाटामध्ये ट्रॅव्हल्स पलटी झाली. ब्रेक फेल झाल्याने चालकाने डोंगरकडील बाजूला ट्रॅव्हल्स कठड्याला धडकल्याने हा अपघात झाला. गुरुवारी (दि.30) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात चालकासह सात जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, हैदराबादहून कराडला येणारी ट्रॅव्हल्स सुर्ली घाटात आल्यानंतर अचानक ब्रेक फेल झाली. ही बाब चालकाच्या लक्षात येतच त्यांनी गिअर वरती ट्रॅव्हल्स नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केला. परंतु घाटातील उतारा वरती ट्रॅव्हल्स नियंत्रणात येत नाही, हे लक्षात येताच चालकाने डोंगराकडील बाजूला ट्रॅव्हल्सची एक बाजू घासत ट्रॅव्हल्स कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. तरीही ट्रॅव्हल्स थांबत नसल्याने नाईलाजास्तव चालकाने एका मोठ्या वळणावरती ट्रॅव्हल्स रस्त्याकडेचा कठडा तोडून डोंगराकडच्या बाजूला घातली. त्यामुळे ट्रॅव्हल्स चढावरती गेल्याने रस्त्यावर पलटी झाली.

या अपघातामध्ये चालकासह क्लीनर व प्रवासी असे एकूण सात जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर कराड-विटा मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. घाटातील वाहतूक सुरळीत करून त्यांनी घटनेचा पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू केली.

चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला...

दरम्यान, चालकाने प्रसंगावधान राखल्याने ट्रॅव्हल्स मधील प्रवासी तसेच घाटात विरुद्ध दिशेने येणारी वाहने यांच्याबाबत मोठा अनर्थ टळला. चालकाने डोंगराकडील बाजूला धडकवून ट्रॅव्हल्स पलटी केली नसती तर पुढून येणाऱ्या वाहनांना धडकत किंबहुना दरीत कोसळून मोठा अनर्थ झाला असतो, असे घटनास्थळी बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news